बारचालकाला धमक्या देऊन 'हप्ता' मागितल्याप्रकरणी फौजदार निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2021 06:08 PM2021-10-27T18:08:05+5:302021-10-27T18:10:40+5:30
या प्रकरणाची पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी चौकशी केली
जालना : पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी मंगळवारी घनसावंगी ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे यांना तडकाफडकी निलंबित केले. अंबड येथील एका हाॅटेलचालकाने चाटे वारंवार त्रास देऊन पैसे मागत असल्याची लेखी तक्रार पोलीस अधीक्षकांकडे केली होती. या प्रकरणाच्या चौकशीअंती ही कार्यवाही करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी सांगितले.
घनसावंगी ठाण्यात बदली झालेली व पूर्वी अंबड ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे हे आपल्या हॉटेलवर येऊन धमक्या देऊन दरमहा दहा हजार रुपयांचा हप्ता घेत असल्याची तक्रार एका बारचालकाने पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांच्याकडे १३ ऑक्टोबर रोजी केली होती. हप्ता दिला नाही, तर खोटे गुन्हे दाखल करून हॉटेल बंद करून लायसन्स रद्द करण्याची धमकीही उपनिरीक्षक चाटे यांनी दिल्याचे तक्रारीत नमूद होते, तसेच त्यांनी वारंवार पैसे घेऊन एका फोनपे द्वारे दोन हजार रुपये घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.
दरम्यान, या प्रकरणाची पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी चौकशी केली असता, चाटे यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.