सदोष कोरोना कीट्सचे प्रकरण : जालन्यात रात्र जागून कोविड लॅब उभाणाऱ्या तज्ज्ञांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 06:56 PM2020-10-16T18:56:31+5:302020-10-16T18:56:55+5:30
coronavirus दोन्ही तज्ज्ञांना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी कारणे दाखवा नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे.
जालना : कोरोना काळात चाचण्यांना मोठे महत्व आहे. पूर्वी जालना जिल्ह्यातील संशयितांचे स्वॅबचे सँपल हे औरंगाबाद येथील शासकीय प्रयोगशाळेकडे पाठविले जात होते. त्यामुळे तब्बल २४ ते ३६ तास लागत होते. त्यामुळे जालन्यात कोविड टेस्टींगची लॅब व्हावी यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी पुढाकार घेऊन एक कोटी १० लाख रूपये खर्च करून ही टेस्टींग लॅब जालन्यात उभारली. ही लॅब उभारणीसाठी डॉ. शेजूळ आणि अन्य एका खाजगी पॅथोलॉजिस्ट डॉ. सूर्यकांत हयातनगरकर यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन विक्रमी वेळेत ही लॅब उभारली होती. परंतु आता या दोन्ही तज्ज्ञांना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी कारणे दाखवा नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे.
जालन्यात कोरोनाचा पहिला रूग्ण हा एप्रिलमध्ये सापडला होता. त्या नंतर रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत गेली. त्यामुळे जास्तीत जास्तीस्त गतीने कोरोना संशियितांच्या स्वॅबची तपासणी होणे गरजेचे होते. त्यामुळे जालन्यात कोरोना टेस्टींग लॅब व्हावी म्हणून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांनी देखील तातडीने यासाठी मुख्यमंत्री निधीतून एक कोटी रूपये दिले. आणि जूनमध्ये ही लॅब जिल्हा सरकारी रूग्णालयात उभारणीसाठी मंजूरी मिळाली. त्या नंतर आरोग्य मंत्री टोपे यांनी येथील ज्येष्ठ पॅथोलॉजिस्ट डॉ. सूर्यकांत हयातनगरकर यांची यासाठी तज्ज्ञ म्हणून नेमणूक केली होती.
त्यांनी तसेच शासकीय प्रयोगशाळेतील प्रमुख डॉ. शेजूळ या दोघांनी मिळून कोविड लॅबच्या फरशी बसविण्यापासून ते लॅबच्या उद्घाटन आणि नंतर सँपलचे रिपोर्ट येथेच मिळेपर्यंत सर्व ते केले. हे सर्व करताना या दोघांनी मोठे परिश्रम घेतले. ज्यावेळी ही लॅब येथे उभारण्याचा निर्णय झाला होता, त्यावेळी जागा निवडण्यासह अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित करतांना ती कुठे करावी आदी लहानातील लहान बाब देखील या व्दयींनी तंतोतंत पाहिल्यानेच जालन्याची लॅब संपूर्ण राज्यात अत्याधुनिक झाली आहे. या लॅबच्या धर्तीवर नंतर अन्य जिल्ह्यातही लॅबची उभारणी करण्यात आली. एवढे सर्व करतांना काही किरकोळ कारणांवरून दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याने वैद्यकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे.
डॉ. हयातनगरकरांकडून सदोष कीट्सचा मुद्दा उपस्थित
जालन्यात मध्यंतरी कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने घटल्याचे दिसून येत होते. परंतु कीट्समध्ये तांत्रिक दोष असल्याची बाब डॉ. हयातनगरकर आणि डॉ. शेजूळ यांच्या लक्षात आली. त्यांनी राज्याचे आरोग्य विभागाचे ज्येष्ठ तज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांच्या समवेत झालेल्या आॅनलाईन बैठकीत हा मुद्दा मांडून त्यांचे लक्ष वधेले होते. त्या नंतर सर्व यंत्रणा खडबडून जागे झाली. आणि हा मुद्दा आरोग्य मंत्री तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्र्या पर्यंत पोहचला. या कीट्सचा पुरवठा करणाऱ्या खाजगी कंपनीच्या कीट्स सँपलच्या तपासणीसाठी नाकारण्यात आल्या असून, काळ्या यादीत असलेल्या कंपनीकडून या कीट्सची खरेदी करण्यात आल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. आता यात चौकशी समिती नेमून या सर्व प्रकरणाची पोलखोल होणे गरजेचे झाले आहे.