शेलूदचे धामणा धरण फुटण्याची भीती व्यर्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 12:22 AM2019-07-04T00:22:36+5:302019-07-04T00:22:56+5:30
शेलूद येथील धामणा धरणाच्या सांडव्याला पडलेल्या चिरांमधून पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी धरण फुटण्याची भीती व्यर्थ असल्याचे सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : तालुक्यातील शेलूद येथील धामणा धरणाच्या सांडव्याला पडलेल्या चिरांमधून पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे.
या गळतीमुळे धरण फुटण्याची चर्चा बुधवारी सकाळीच या भागात सुरू झाली होती. परिणामी धरणाच्या खालील शेलूद, लेहा, पारध खु, पारध बु, या गावांसह बुलडाणा जिल्ह्यातील म्हसला या गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी अभियंत्यांच्या चर्चेनंतर धरण फुटण्याची भीती व्यर्थ असल्याचे त्यांनी गावकऱ्यांशी बोलताना सांगितले.
भोकरदन तालुक्यात मागील पंधरा दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असून, मंगळवारीही दमदार पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील धामणा धरणात ८५ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे. मात्र, मंगळवारी रात्रीपासूनच सांडव्याच्या खालच्या बाजूस पडलेल्या चिरांमधून ५ ते ६ ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे. त्यामुळे धरण फुटण्याची चर्चा परिसरात सुरू झाली आणि नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, तहसीलदार संतोष गोरड, कनिष्ठ अभियंता एस.जी.राठोड आदींनी धामणा धरण परिसराची पाहणी केली. पाहणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिका-यांना गळती रोखण्याच्या सूचना दिल्या. तसेच नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी गटविकास अधिकारी अरुण चोलवार, सहायक पोलिस निरीक्षक शंकर शिंदे, नायब तहसीलदार के. टी. तांगडे, राजेंद्र देशमुख, मनीष श्रीवास्तव, सभापती कौतिक जगताप, गजानन तांदुळजे, श्रीराम खडके, यांच्यासह तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, या परिसरातील नागरीक उपस्थित होते. यावेळी नागरिकांनीही जिल्हाधिकारी बिनवडे यांना पडणारे प्रश्न उपस्थित करून शंका मांडल्या.
१९७२ साली बांधले होते धरण
शेलूद व परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघावा म्हणून १९७३ ला हे धरण बांधून पूर्ण झाले होते.
या धरणाची साठवणूक क्षमता ०.७२ द.ल.घ.मी. एवढी असून, आज घडीला यामध्ये ९.२ द.ल.घ.मी. एवढा पाणीसाठा आहे. त्यामुळे हे धरण तुडुंब भरले आहे. या धरणामुळे परिसरातील १ हजार ७८८ हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल, अशी अपेक्षा होती. २०१३ नंतर हे धरण पहिल्यांदाच ओव्हरफ्लो झाले आहे.
जिल्हाधिकाºयांचा ट्रॅक्टर आणि पायी प्रवास
शेलूद येथील धरण फुटण्याच्या भीतीने बुधवारी दिवसभर परिसरात घबराटीचे वातावरण होते. परंतु नागरिकांना दिलासा देण्यासह प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी बिनवडे व अन्य अधिका-यांनी शेलूद येथे दुपारी भेट दिली.
त्यावेळीदेखील रिमझीम पाऊस पडत असल्याने धरणापर्यंत जाण्यासाठी जिल्हाधिकारी तसेच अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, अभियंता एस.जी. राठोड यांनी ट्रॅक्टरमधून वाट काढली.
तसेच काही ठिकाणी जिल्हाधिकाºयांनी पायी जाऊन पाहणी करून स्थितीचा आढावा घेतला. यावेळी शेलूदसह पारध बुद्रुक, पारध खुर्द, लेहा तसेच बुलडाणा जिल्ह्यातील मसला, टाकळी, सातगाव या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला.