भीती वाटली पण..एकमेकींना धीर दिल्यामुळे वाचलो...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:48 AM2018-03-16T00:48:52+5:302018-03-16T11:15:00+5:30
लहान बहीण विहिरीत पडल्यानंतर तिला वाचविण्यासाइी मोठ्या बहिणीने विहिरीत उडी घेतली. भीती वाटत होती, परंतु दोघींनी एका दोराला धरून एकमेकींना धीर दिला. ग्रामस्थांनी त्यांना वर काढले अन मृत्यूशी सुरू असलेली झुंज यशस्वी झाली.
कुंभार पिंपळगाव ( जालना ) : लहान बहीण विहिरीत पडल्यानंतर तिला वाचविण्यासाइी मोठ्या बहिणीने विहिरीत उडी घेतली. भीती वाटत होती, परंतु दोघींनी एका दोराला धरून एकमेकींना धीर दिला. ग्रामस्थांनी त्यांना वर काढले अन मृत्यूशी सुरू असलेली झुंज यशस्वी झाली. घनसावंगी तालुक्यातील सिंदखेड येथे बुधवारी सायंकाळी हा प्रकार घडला.
सिदखेड येथील शीतल एकनाथ आधुडे (१५) माधुरी एकनाथ आधुडे (१७) या सख्ख्या बहिणी शेतात गेल्याच्यानंतर धाकटी शीतल अचानक तोल जाऊन विहिरीत पडली. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात माधुरीने विहिरीत उडी मारली. दोघी पाण्यात बुडत असताना शीतलच्या हातात विहिरीतील दोर आला. दोघींनी वाचविण्यासाठी आवाज देण्यास सुरुवात केली. मात्र, आजूबाजूला कुणीही नसल्याने व विहीर ७५ खोल असल्याने दोघींनी २२ फुटापर्यंत पाणी असलेल्या विहिरीत दोरीला धरून एकमेकींना धीर दिला.
यावेळी शेतात फेरफटका मारण्यासाठी गेलेले लक्ष्मण आधुडे यांनी आवाजामुळे विहिरीत डोकावून पाहिले, असता त्यांनी दोन्ही मुली दोरीला धरून वाचविण्यासाठी धावा करत असल्याचे पाहिले. त्यांनी लगेच ग्रामस्थांन बोलावले. त्यानंतर दोघींनाही विहिरीतून वर काढण्यात आले. दोन्ही मुलींच्या धैर्याचे ग्रामस्थांनी कौतुक केले.