धास्तीने गणेश भक्तांची पाऊले थबकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 11:37 PM2020-03-12T23:37:31+5:302020-03-12T23:38:16+5:30
कोरोनाच्या संकटामुळे चतुर्थीच्या दिवशी देखील राजूरसह अन्य गणेश मंदिरामधील भाविकांच्या दर्शनासाठी येण्यावर परिणाम झाल्याचे विश्वस्तांनी सांगितले
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : हिंदू संस्कृतीत गणेशाला विघ्नहर्ता म्हणून संबोधले जाते. परंतु कोरोनाच्या या संकटामुळे चतुर्थीच्या दिवशी देखील राजूरसह अन्य गणेश मंदिरामधील भाविकांच्या दर्शनासाठी येण्यावर परिणाम झाल्याचे विश्वस्तांनी सांगितले. भाविकांचे आराध्य दैवत म्हणून ओळख असलेल्या राजूर येथील गणपतीच्या दर्शनासाठी चतुर्थीच्या दिवशी रांगा लावून दर्शन घ्यावे लागते. अनेक भाविक हे पायी वारीव्दारेही दर्शनासाठी जातात. परंतु गुरूवारी पार पडलेल्या चतुर्थीला दर्शनास येणाऱ्या भाविकांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले.
राजूर येथील गणपतीच्या दर्शनासाठी दर चतुर्थीला लाखो भाविकांची गर्दी असते. त्यामुळे मंदिरा समोर लांबच-लांब रांगा लावून दर्शन मिळते. किमान एक ते दीड तास रांगेत राहिल्यावरच दर्शन मिळत होते. ते आज अगदी कुठलीच रांग नसल्याने भाविकांना दर्शनासाठी अवघे दहा मिनिटेही लागली नसल्याचे दिसून आले. भाविकांची कोरोनाच्या धास्तीने राजूरसह अन्य मंदिरात जाणे टाळले. खूप आवश्यक असल्यासच गर्दी करावी अशा सूचना यापूर्वीच जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. त्याचेही पालन अनेक नागरिकांनी केल्याने ही गर्दी कमी झाल्याचे दिसून आले.
राजूर : व्यापारावर परिणाम
दर चतुर्थीला राजूर येथील दुकांनामध्ये मोठ्या प्रमाणावर उलाढाल होते. परंतु या चतुर्थीला प्रथमच एवढ्या कमी भाविकांची उपस्थिती दिसून आली. याचा मोठा फटका येथील व्यापाऱ्यांना बसल्याचे दिसून आले. एसटी महामंडळासह खाजगी वाहतुकीवरही भाविकांच्या कमी गर्दीचा परिणाम झाल्याचे व्यापा-यांनी सांगितले.