पारनेरमध्ये फळबागेला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 01:04 AM2018-04-01T01:04:51+5:302018-04-01T01:04:51+5:30
अंबड तालुक्यातील पारनेर येथील डॉ. समी फैसल चाऊस यांच्या फळबागेला शनिवारी दुपारी आग लागली.
लोकमत न्यूज नेटवर्क
रोहिलागड : अंबड तालुक्यातील पारनेर येथील डॉ. समी फैसल चाऊस यांच्या फळबागेला शनिवारी दुपारी आग लागली. यामध्ये आंबा, चिकू व जांबच्या बागेचे सुमारे १५ एकरचे नुकसान झाले. अंबड अग्निशमन दल व स्थानिकांच्या मदतीने तीन तासात आग आटोक्यात आली. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही.
पारनेर परिसरात गट क्रमांक ७६ मध्ये डॉ. चाऊस यांची बगायती शेती आहे. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास शेतात आग लागली. कडक उन्हामुळे आग आजूबाजूच्या बागेत सरकत गेली.
काही अवधीतच आग लागली. आगीमुळे आंब्याची २५ झाडे होरपळली. चिकू बागेतील ३०० व पेरुच्या बागेतील २६० झाडे जळाली. त्यामुळे नुकत्याच आकार घेत असलेल्या आंब्यांचे नुकसान झाले. परिसरात काही शेतकरी शेतात काम करत होते. त्यांनी आरडाओरडा केल्याने लोक जमा झाले. काहींनी मोबाईलवरून ग्रामस्थांना संपर्क साधल्यावर घटनास्थळी गर्दी झाली. शेख हुसेन, बबन खांडेभराड, सखाराम खांडेभराड, राम गडगुळ, भगवान खांडेभराड, जनार्धन बाबर, सलमान तारेख चौस, फैसल बामर, दिनेश माने, सलीम तंबोळी, फारेश चौस अलीम शेख आदींनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. अंबड येथील अग्निशमन बंब शेतात पोहचला. खाजगी टँकरही बोलावण्यात आले. तीन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविता आले. अचानक लागलेल्या या आगीमुळे फळबागेचे नुकसान झाल्याचे डॉ. समी चाऊस यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.