साथरोगाचा ताप जिल्हा परिषदेच्या सभागृहात चांगलाच 'फणफणला'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:32 AM2021-09-25T04:32:20+5:302021-09-25T04:32:20+5:30
जालना : जिल्ह्यात सध्या डेंग्यू, चिकनगुनियाचा 'ताप' सर्वसामान्यांना सहन करावा लागत असून, रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध होणे मुश्कील झाले आहे. ...
जालना : जिल्ह्यात सध्या डेंग्यू, चिकनगुनियाचा 'ताप' सर्वसामान्यांना सहन करावा लागत असून, रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध होणे मुश्कील झाले आहे. साथरोगांचा हा 'ताप' जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती बैठकीत चांगलाच 'फणफणला'. मिशन कवच कुंडलअंतर्गत कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे काम उत्कृष्टरीत्या करणाऱ्या आरोग्य विभागाने यापूर्वीच्या बैठकीत केलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने जिल्ह्यात साथरोगाचा फैलाव झाल्याचा ठपका उपस्थित सदस्यांनी ठेवला.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जिल्हा परिषद स्थायी समितीची बैठक झाली. यावेळी उपाध्यक्ष महेंद्र पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर व इतरांची उपस्थिती होती. सभेच्या प्रारंभीच जि. प. सदस्य राहुल लोणीकर, शालिकराम म्हस्के, जयमंगल जाधव यांनी जिल्ह्यात पसरलेल्या साथरोगांवरून अधिकाऱ्यांसमोर प्रश्नांचा भडिमार केला. मिशन कवच कुंडलअंतर्गत जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे काम कौतुकास्पद झाले आहे; परंतु हे काम करीत असताना साथरोगांवरील उपाययोजनांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. आरोग्य विभागाची साथरोगावर काम करणारी यंत्रणा कोलमडल्याची तक्रार करण्यात आली. शिवाय प्राथमिक आरोग्य केंद्रांना फॉगिंग मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत; परंतु त्या आजवर सुरूच झालेल्या नाहीत. त्यामुळे त्यावरील लाखोचा खर्च वाया गेल्याचा आरोपही करण्यात आला. त्यावर अध्यक्ष वानखेडे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिंदल, आरोग्य अधिकारी खतगावकर यांनी साथरोग नियंत्रणासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. लोणीकर यांनी सेजलगाव येथील शालेय पोषण आहार बाजारात विक्री केल्या प्रकरणात संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. बबनराव खरात यांनी वाघ्रुळ केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त जागा तत्काळ भरून रुग्णांची गैरसेाय दूर करण्याची मागणी केली.
शासकीय कामासाठी वाळू उपलब्ध करा
शाळा, अंगणवाडी, घरकुलासह इतर विविध बांधकामे शासकीय योजनांमधून केली जात आहेत; परंतु ही कामे वाळूअभावी ठप्प पडली आहेत. एका ट्रॅक्टरला ४२ हजार रुपये घरकुल लाभार्थ्यांना मोजावे लागत आहेत. त्यामुळे लाभार्थी घरकुल बांधणार कसे असा प्रश्न बप्पासाहेब गोल्डे यांनी उपस्थित केला. किमान शासकीय योजनांमधील बांधकामासाठी नियमानुसार वाळू उपलब्ध करून द्यावी. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करण्याची मागणी गोल्डे यांनी केली. शिवाय जिल्हा परिषद शाळांमधील विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येक सदस्यांनी शाळांवर सोलार पॅनल बसविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन गोल्डे यांनी केले.
प्रयोगशाळांची होणार तपासणी
जिल्ह्यातील ४० शाळांमध्ये अद्यावत प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत; परंतु अनेक शाळांमध्ये वीज नाही. वर्गखोल्यांचा अभाव आहे. काही ठिकाणी विज्ञानाचे शिक्षकच नाहीत. त्यात प्रयोगशाळांमध्ये आलेलेे साहित्यही निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार शालीकराम म्हस्के यांनी केली. यावर राहुल लोणीकर, जयमंगल जाधव यांनीही या प्रयोगशाळेतील साहित्याच्या दर्जाची चौकशी करावी. चौकशी करेपर्यंत संबंधिताला देयके देऊ नयेत, असा ठराव मांडला. त्यानुसार जिंदल यांनी चौकशी करण्याचे आश्वासन दिले.
अंगणवाडीचे काम करा किंवा निधी द्या
सोयगाव देवीअंतर्गत पेरजापूर येथील अंगणवाडीचे काम अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे या अंगणवाडीच्या कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अन्यथा काम अर्धवट सोडणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आशा पांडे यांनी यावेळी केली. शिवाय संबंधित अंगणवाडी परिसरात करण्यात आलेल्या इतर कामांची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी लावून धरली.
जि.प.च्या जागांवरील अतिक्रमण हटणार
स्थायी समितीच्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या जागा आणि त्यावरील अतिक्रमणाचा मुद्दाही सदस्यांनी लावून धरला. जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील जागांची माहिती संकलित करावी. झालेले अतिक्रमण हटवून त्याला तार कम्पाऊंड करावे, उपलब्ध जागेवर बीओटी तत्त्वावर शॉपिंग सेंटर बांधून जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात वाढ करावी. त्यासाठी तालुकानियहाय शॉपिंग सेंटरचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, असा सूरही उपस्थित सदस्यांनी काढला.