उद्दिष्टाच्या पन्नास टक्केच वृक्षलागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 12:34 AM2019-08-08T00:34:37+5:302019-08-08T00:35:14+5:30
जालना जिल्ह्याला वृक्ष लागवडीचे जवळपास एक कोटी ५ लाख ६७ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. पैकी जवळपास ५० लाख २४ हजार रोपांची लागवड करण्यात आल्याची माहिती सहायक वनसंरक्षक पुष्पा पवार यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांना दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना जिल्ह्याला वृक्ष लागवडीचे जवळपास एक कोटी ५ लाख ६७ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. पैकी जवळपास ५० लाख २४ हजार रोपांची लागवड करण्यात आल्याची माहिती सहायक वनसंरक्षक पुष्पा पवार यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांना दिली. केंद्रेकर यांनी बुधवारी जालन्यातील वनविभागासह जिल्हा क्रीडा संकुलाला भेट दिली. यावेळी उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठीच्या सूचना देऊन, क्रीड संकुलाचे कामही लवकर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
बुधवारी सकाळी सुनील केंद्रेकर हे जालन्यात दाखल झाले. तत्पूर्वी त्यांच्या हस्ते बदनापूर तालुक्यातील वरूडी येथे वृक्षारोपण करण्यात आले. जालन्यात आल्यावर त्यांनी प्रारंभी जिल्हा क्रीडा संकुलाला भेट दिली. तेथे सुरू असलेल्या व्यायामशाळेच्या कामाची पाहणी त्यांनी केली.
केंद्रेकर हे क्रीडा विभागाचे संचालक असताना जालन्यातील या क्रीडा संकुलाच्या दुरुस्तीसाठी पाच कोटी रूपये मंजूर केले होते. परंतु पाहिजे तसे काम न झाल्याची खंत त्यांनी यापूर्वीच व्यक्त केली होती. त्यांनी बुधवारी जिल्हा क्रीडा अधिकारी प्रमोदनी अमृतवाड यांना वेगवेगळ्या सूचना केल्या.
क्रीडा संकुलाची पाहणी केल्यावर केंद्रेकर यांनी कन्हैयानगरमधील वन विभागालाही भेट दिली. तसेच तेथे सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेऊन सूचना दिल्या.
जालना जिल्ह्याला जवळपास एक कोटी ५ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. यापैकी आज घडीला म्हणजेच बुधवारपर्यंत यातील पन्नास टक्केच उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. हे उद्दिष्ट १५ आॅगस्ट पर्यंत पूर्ण करावयाचे आहे. त्यासाठी सर्व विभागांनी तातडीने पावले उचलण्याचे निर्देश केंद्रेकर यांनी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा यांना दिले.
यावेळी सहायक वन संरक्षक पुष्पा पवार यांचीही उपस्थिती होती. पवार यांनी रोप निर्मितीची माहिती केंद्रेकरांना दिली. तसेच गेल्या वर्षभरात जालन्यातील रोपवाटिकेत एक कोटी विविध प्रकारची रोपे तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी तहसीलदार सुधाळकर यांची उपस्थिती होती.
बदनापूर तालुक्यातील वरूडी येथील जिल्हा परिषद शाळेतील रोपवाटिकेची विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी भेट देऊन पाहणी केली व ग्रामस्थांशी वृक्ष लागवडीबाबत बुधवारी संवाद साधला. तालुक्यातील वरूडी येथे बुधवारी सकाळी केंद्रेकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी जि. प. शाळेत ‘माझी शाळा माझी रोपवाटिका’ या योजनेअंतर्गत शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या २६०० रोपे असलेल्या रोपवाटिकेची पाहणी केली.
यावेळी ते म्हणाले, वृक्ष लागवड जर मोठ्या प्रमाणात झाली तर जमिनीची धूप थांबेल व पर्जन्यमान वाढेल. यावेळी तहसीलदार छाया पवार, गटविकास अधिकारी व्ही. आर. हरकळ, गटशिक्षणाधिकारी एस. एन. कडेलवार, विस्तार अधिकारी क्षीरसागर, मुख्याध्यापक भास्कर चव्हाण, ग्रामसेवक एस. आर. घोडके, राधाकिसन शिंदे, सैयद हैदर सेठ आदींची उपस्थिती होती.