प्लॉट विक्री प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 12:43 AM2019-03-19T00:43:45+5:302019-03-19T00:44:08+5:30
जालना शहरातील एका मालमत्तेमधील वेगवेगळ्या प्लॉटची दोघांना परस्पर विक्री करण्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना शहरातील एका मालमत्तेमधील वेगवेगळ्या प्लॉटची दोघांना परस्पर विक्री करण्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी दहा लाखाची फसवणूक झाल्याची तक्रार रुपेश रमेश राहतेकर यांनी दिली. यावरून कदीम जालना पोलीस ठाण्यात कैलास राधाकृष्ण क्षीरसागर यांच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संगमनेर (जि. अहमदनगर) येथील रहिवासी असलेले रुपेश राहतेकर यांनी जालना येथील कैलास क्षीरसागर यांच्याकडून शहरातील सिटी सर्व्ह क्रमांक ३८४/०१ आणि ३८४/२ मधील प्लॉट क्रमांक १६, १७ आणि १८ विकत घेतले होते. त्यासाठी त्यांनी रीतसर दहा लाख रुपये देऊन त्याची सहायक निबंधक कार्यालयातही नोंदणी केली होती. दरम्यान, राहतेकर यांनी खरेदी खत केल्यानंतर प्लॉटच्या नामांतर करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयात जाऊन नोंदणीची माहिती घेतली असता संबंधित मालमत्तांच्या पत्रावरुन भलताच प्रकार उघडकीस आला आहे.
त्यात कैलास क्षीरसागर यांनी विकत घेतलेले तिन्ही प्लॉट हे इतर व्यक्तींना विक्री केले असून, त्याची नोंदही मालमत्ता पत्रावर असल्याचे दिसून आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याने राहतेकर यांच्या लक्षात आले.
याप्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन कैलास क्षीरसागर यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूणच हा सर्व प्रकार गंभीर असून, भूमी अभिलेख कार्यालतील काही कर्मचाऱ्यांशी संगनमत करून हे काम केले की, अन्य कोणत्या मार्गाने या एकाच मालमत्तेतील प्लॉटची विल्हेवाट लावली, हे तपासानंतरच कळेल.