निवडणूक कामात कुचराई केल्याने प्राचार्याविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 07:50 PM2019-03-28T19:50:47+5:302019-03-28T19:53:03+5:30
शहरातील गोदावरी महाविद्यालयाने निवडणूक विभागाला याप्रकरणी सहकार्य केले नाही.
अंबड (जि. जालना) : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कामात कुचराई केल्याप्रकरणी अंबड येथील गोदावरी महाविद्यालयाचे प्राचार्य रामेश्वर हेमराज पवार यांच्यावर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांच्या आदेशाने बुधवारी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
उपविभागीय कार्यालयाचे नायब तहसीदार चिंतामण मिरासे यांनी अंबड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मतदान प्रक्रियेसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी निवडणूक विभागाने जानेवारी महिन्यात सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच शैक्षणिक संस्थांना कार्यालयात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती मागविली होती. मात्र शहरातील गोदावरी महाविद्यालयाने निवडणूक विभागाला याप्रकरणी सहकार्य केले नाही.
गोदावरी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांची माहिती सादर करण्याविषयी प्राचार्य पवार यांना सूचित केले मात्र, प्राचार्य पवार यांना वारंवार सूचना देऊनही त्यांनी माहिती दिली नाही. यामुळे त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांनी बुधवारी दिले.
160 जणांवर होणार गुन्हे दाखल
सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्राचार्य रामेश्वर पवार यांनी निवडणूक कामात कुचराई केल्याने त्यांच्याविरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगितले. २३ मार्च रोजी निवडणुकीच्या प्रशिक्षणासाठी गैरहजर असणाऱ्या १६० कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्याचे संकेत हदगल यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले.