वाहतूक सिग्नल दुरूस्तीचे काम अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 01:13 AM2020-01-15T01:13:29+5:302020-01-15T01:14:07+5:30

शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी कालिका ग्रुपच्या माध्यमातून काही ठिकाणचे वाहतूक सिग्नल बसविले जात आहेत.

The final phase of traffic signal repair work | वाहतूक सिग्नल दुरूस्तीचे काम अंतिम टप्प्यात

वाहतूक सिग्नल दुरूस्तीचे काम अंतिम टप्प्यात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी कालिका ग्रुपच्या माध्यमातून काही ठिकाणचे वाहतूक सिग्नल बसविले जात आहेत. शहरातील सुभाष चौकातील सिग्नल सुरू झाला असून, मामा चौकातील सिग्नलचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतर शनी मंदिर, अंबड चौफुली येथील वाहतूक सिग्नलचे काम हाती घेतले जाणार आहे. दरम्यान, शहरातील सिग्नल सुरू होत असले तरी मोकाट जनावरांविरूध्दची कारवाई मात्र, थंड बस्त्यात गुंडाळण्यात आली आहे.
उद्योगनगरी असलेल्या जालना शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून कायम आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी शहरातील २० ते २२ ठिकाणी सिग्नल यंत्रणाही बसविण्यात आली होती. मात्र, ही सिग्नल यंत्रणा काही वर्षात बंद पडली. बंद पडलेली यंत्रणा सुरू करण्यासाठी येणारा खर्च मोठा असल्याने याकडे प्रशासनाने अपेक्षित लक्ष दिले नाही. मात्र, वाहतूक शाखेचे पोनि चतुर्भुज काकडे यांनी कालिका ग्रुपसह शहरातील इतर सामाजिक काम करणाऱ्या संस्था पदाधिकाऱ्यांशी वाहतूक सिग्नल सुरू करण्याबाबत चर्चा केली होती. त्यानंतर कालिका ग्रुपच्या पुढाकारातून शहरातील काही ठिकाणच्या वाहतूक सिग्नलचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार सुभाष चौकातील वाहतूक सिग्नल सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी सुटण्यास मदत झाली आहे. त्यानंतर मामा चौकातील वाहतूक सिग्नल दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
या ठिकाणावरील सिग्नलचा लोखंडी खांब वगळता पॅनल, वायरिंग, सिग्नलचे बल्ब यासह इतर बहुतांश साहित्य नव्याने टाकण्यात आले आहे. सिग्नल वायरिंंग जोडण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, हे काम लवकरच पूर्णत्वाकडे येणार आहे. त्यामुळे बाजारपेठेत जाणा-या या प्रमुख मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्नही मार्गी लागणार आहे.
मामा चौकातील सिग्नल सुरू झाल्यानंतर सर्वाधिक कोंडी होणा-या शनि मंदिर चौकातील सिग्नल व अंबड चौफुलीवरील सिग्नल सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. अंबड चौफुली मार्गावरील शासकीय कार्यालये, महामार्गांमुळे येथील सिग्नल वेळेत सुरू होण्याची गरज आहे.
दरम्यान, वाहतूक शाखेने काही महिन्यांपूर्वी मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम हाती घेतली होती. संबंधित जनावरांच्या मालकांविरूध्द दंडही केला जात होता. काही दिवसच ही मोहीम राबविण्यात आली. विशेषत: मोकाट जनावरे पकडण्याठी एक वाहन मिळाल्याचेही सांगण्यात आले होते. मात्र, त्यानंतर मोकाट जनावरांविरूध्द कारवाई झाल्याचे दिसून येत नाही.

Web Title: The final phase of traffic signal repair work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.