अखेर जालन्यात होणार सिडकोची वसाहत..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 12:44 AM2018-04-19T00:44:15+5:302018-04-19T00:44:15+5:30
मुंबईत बुधवारी झालेल्या बैठकीत खरपुडी परिसरातील जागेवर शिक्कामोर्तब करीत सिडकोच्या प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्त्वत: मान्यता दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : खासगाव आणि घाणेवाडी येथे सिडको वसाहत निर्माण करण्याबाबतचा अहवाल प्रशासनाला अहवाल पाठविण्यात आला. मात्र, या ना त्या कारणाने दोन्ही जागा तांत्रिकदृष्ट्या योग्य नसल्याचे सांगत हा प्रकल्प रद्द करण्यात आला. अखेर मुंबईत बुधवारी झालेल्या बैठकीत खरपुडी परिसरातील जागेवर शिक्कामोर्तब करीत सिडकोच्या प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्त्वत: मान्यता दिली. याचा अभ्यासपूर्ण अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीस भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्यासह प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते.
यापूर्वी बदनापूर तालुक्यातील खासगाव येथील जमिनीची पाहणी करुन सिडकोने अहवाल पाठवला होता. अधिकाºयांनी जागेची पाहणी केली. त्यानंतर त्याबाबतचा अहवाल प्रशासनाकडे पाठवला. मात्र, प्रदूषण, संभाव्य पाणीटंचाई आदी मुद्द्यांवर हा प्रस्ताव रखडला. त्यानंतर घाणेवाडी परिसरातील जागेची पाहणी करण्यात आली. पाण्याची उपलब्धता आणि इतर बाबी सकारात्मक दिसून आल्याने या जागेचा अहवाल पाठविण्यात आला. मात्र, तांत्रिक मुद्द््यावर येथेही वसाहत निर्माण करण्यात अडचणी असल्याचे सांगत हा प्रस्तावदेखील कालातंराने रद्द करण्यात आला. भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी आ. कैलास गोरंट्याल यांचा पाठपुरावा सुरुच होता. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सिडको व लोकप्रतिनिधींची बुधवारी बैठक होऊन अखेर खरपुडी येथील जागेवर शिक्कामोर्तब झाले.
११०० हेक्टरवर साकारणार सिडको वसाहत
प्रस्तावित जालना सिडको प्रकल्प हा मौजे खरपुडी गावात होणार आहे. सिडकोची नियुक्ती ही विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून करण्यात आली आहे. पर्यावरणाचा समतोल राखता यावा यासाठी पर्यावरण सल्लागाराची नियुक्ती करून अहवाल सप्टेंबर २०११ रोजी प्रधान सचिवांना सादर करण्यात आला आहे. खरपुडी गावातील एकूण क्षेत्रापैकी ५५९.३६ हेक्टर इतके क्षेत्र रहिवासी प्रभागात समाविष्ट असून, उर्वरित ६५०.६५ हेक्टर क्षेत्र हरित भागात समाविष्ट आहे. या क्षेत्रावर शहर विकसित करण्याचे प्रस्तावित आहे. सिडको वसाहतीच्या निमित्ताने जालनेकरांना गृहप्रकल्पाचा चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे.