अखेर जालन्यातील वैद्यकीय महाविद्यालयास निधी मंजूर
By विजय मुंडे | Published: June 28, 2023 08:16 PM2023-06-28T20:16:15+5:302023-06-28T20:16:35+5:30
राज्य शासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात जालना येथील वैद्यकीय महाविद्यालयासाठी निधीची तरतूद केली नव्हती. त्यामुळे आ. कैलास गोरंट्याल यांनी विधीमंडळाच्या पायऱ्यावर बसूनच आंदोलन केले होते.
जालना : शासनाने बुधवारी राज्यातील नऊ वैद्यकीय महाविद्यालयांसाठी चार हजार ३६५ कोटी ७२ लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे.त्यात जालना येथील १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेच्या तसेच ४३० खाटांच्या वैद्यकीय महाविद्यालयाचा ही समावेश आहे. वैद्यकीय महाविद्यालयास निधी मिळावा, यासाठी आ. कैलास गोरंट्याल यांनी विधानसभेच्या पायऱ्यावर बसून आंदोलन केले होते. आ. गोरंट्याल यांनी हा विषय सातत्याने शासन दरबारी लावून धरला होता.
जालना येथील शासकीय रूग्णालय, स्त्री रूग्णालयात जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील रूग्णही उपचारासाठी येतात. येथील रूग्णालयांवरील वाढलेला रूग्णांचा ताण आणि जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्याची गरज पाहता आ. कैलास गोरंट्याल यांनी गत अनेक वर्षांपासून शासनदरबारी पाठपुरावा केला होता. आ. अमित देशमुख हे वैद्यकीय शिक्षणमंत्री असताना शासनाच्या पथकाने जालना जिल्ह्याचा दौरा करून कुंभेफळ शिवारातील जागेची पाहणी केली होती. त्यानंतर २५ एकर जमीनही वैद्यकीय महाविद्यालयासाठी मंजूर झाली होती. या प्रक्रियेनंतर शासनाने वैद्यकीय महाविद्यालय मंजुरीचा जीआरही काढला होता. परंतु, राज्य शासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात जालना येथील वैद्यकीय महाविद्यालयासाठी निधीची तरतूद केली नव्हती. त्यामुळे आ. कैलास गोरंट्याल यांनी विधीमंडळाच्या पायऱ्यावर बसूनच आंदोलन केले होते. या आंदोलनात माजी मंत्री आ. राजेश टोपे, आ. राजेश राठोड यांनीही सहभाग घेत मागणीला पाठींबा दिला होता.
मनोरूग्णालयाचा प्रश्न कायम
जालना येथील मनोरूग्णालयाच्या बांधकामासाठी जवळपास ९४ कोटींचा निधी मिळाला आहे. त्यासाठी जागाही उपलब्ध आहे. परंतु, शासनाने टाईप प्लॅन बदलांचे कारण देत बांधकामाला स्थगिती दिली आहे. ही स्थगिती अद्याप उठलेली नाही. त्यामुळे जालन्यातील मनोरूग्णालयाचे काम होणार की ते इतर जिल्ह्यात स्थलांतरित होणार यावरही दिवसभर चर्चा रंगली होती.
भाजपकडून जोरदार स्वागत
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जालना- जळगाव नवीन ब्रॉडगेजसाठी ३५५२ कोटी रूपये खर्चास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. याच सोबत जालन्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास निधी दिला आहे. शासनाच्या या निर्णयाचे भाजपाच्या वतीनेही स्वागत करण्यात आले आहे.
पाठपुरावा सुरु राहणार
जालना येथील वैद्यकीय महाविद्यालयासाठी शासनाने निधी मंजूर केला आहे. आपल्या मागणीला यश आल्याचे समाधान असून, वैद्यकीय महाविद्यालयाचे यापुढील काम वेळेत व्हावे, यासाठीही आपला पाठपुरावा राहणार आहे.
- आ. कैलास गोरंट्याल