अखेर केदारखेडा कोल्हापुरी बंधाऱ्यावर बसले गेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 12:57 AM2019-09-23T00:57:46+5:302019-09-23T00:58:16+5:30
केदारखेडा येथील कोल्हापुरी बंधा-याला दरवाजे नसल्याने पावसाचे पाणी वाहून जात होते. याबाबत ‘लोकमत’ने रविवारी वृत्त प्रसिध्द केले होते. वृत्ताची दखल घेत रविवारी सकाळीच संबंधित विभागाने १०० गेट उपलब्ध करून ते बसविण्यासही सुरूवात केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथील कोल्हापुरी बंधा-याला दरवाजे नसल्याने पावसाचे पाणी वाहून जात होते. याबाबत ‘लोकमत’ने रविवारी वृत्त प्रसिध्द केले होते. वृत्ताची दखल घेत रविवारी सकाळीच संबंधित विभागाने १०० गेट उपलब्ध करून ते बसविण्यासही सुरूवात केली आहे.
दुष्काळाच्या झळा सोसणा-या केदारखेडा परिसरात गत पंधरा दिवसांपासून समाधानकारक पाऊस झाला. या पावसामुळे पूर्णा नदीला पूर आला होता. केदारखेडा गावच्या शिवारातून वाहणा-या नदीवर कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आला आहे. मात्र, या बंधा-याला दरवाजे नसल्याने पावसाचे येणारे पाणी नदीपात्रातून वाहून जात होते. केदारखेडा येथील पूर्णा नदीवर मोठा खर्च करुन तीन वर्षांपूर्वी बंधारा उभारण्यात आलेला आहे. मात्र, दोनच गेट आसल्याने नदीला आलेले पाणी वाहून जात होते. गतवर्षी नदीकाठावरील गावांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता आणि अता आलेले पाणी डोळया देखत वाहून जात असल्याने ग्रामस्थांची घालमेल सुरु होती. या अनुषंगाने शुक्रवारी गेट कोणत्या कारणाने टाकले जात नाही यासाठी विशेष बैठक घेतली. बैठकीतील विषय केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना सांगितला. याच बैठकीचा व सर्वसामन्यांची तळमळ पाहून ‘लोकमत’ने रविवारी ‘पाणी आले अन् वाहून चालले’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द केले होते. या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने तात्काळ प्रती चारी तीन प्रमाणे १०० गेट उपलब्ध करुन दिले आहेत.
हे गेट रविवारी सकाळीच टाकण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी जलसंधारणचे उपविभागीय अधिकारी आर. के. जाधव, अंबादास सहाने, श्रीराम जाधव, डिंगाबर तांबडे, गणेश तांबडे, रावसाहेब जाधव आदींची उपस्थिती होती. बंधा-याला गेट बसविले जात असल्याने या भागातील ग्रामस्थ व शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.