अखेर दूध उत्पादकांचे पाच कोटी मिळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 01:07 AM2018-09-23T01:07:37+5:302018-09-23T01:07:59+5:30
जालना जिल्ह्यातील दूध उत्पादकांचे दुधाचे थकेलेले पाच कोटी रूपये अखेर प्राप्त झाले असून, त्यातील अडीच कोटी रूपयांचे वाटप करण्यात आल्याची माहिती दुग्धविकास विभागाकडून देण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना जिल्ह्यातील दूध उत्पादकांचे दुधाचे थकेलेले पाच कोटी रूपये अखेर प्राप्त झाले असून, त्यातील अडीच कोटी रूपयांचे वाटप करण्यात आल्याची माहिती दुग्धविकास विभागाकडून देण्यात आली आहे. यासंदर्भात लोकमतमधून वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. वृत्त प्रकाशित झाल्यावर त्याची दखल दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी घेऊन दुग्धविकास आयुक्तांना तंबी दिली होती.
जालना जिल्ह्यातील दूध उत्पादकांचे गेल्या दोन महिन्यांपासूनची देयके रखडली होती. ती मिळावीत म्हणून शेतकऱ्यांनी वारंवार पाठपुरवा केला होता. मात्र, या संदर्भात लोकमत मधून झारीतील शुक्राचार्यांनी अडवली दूध उत्पादकांची देयके या मथळ्याखाली बातमी दिली होती. त्याची दखल घेत ही थकीत देयके अदा करण्यासाठी लागणारी रक्कम मुंबईतील या विभागाकडून जालन्यातील विभागाकडे वर्ग करण्यात आली. ही रक्कम मिळाल्यावर तातडीने जालना येथील दूध शितीकरण केंद्र तसेच जाफराबाद तालुक्यातील माहोरा आणि विदर्भातील देऊळगावराजा येथील शेतक-यांची जवळपास अडीच कोटी रूपयांची देयके शेतक-यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहेत.