अखेर भोऱ्याच्या मदतीला सरकार धावले: जे.जे. रुग्णालयात डोळ्यावर उपचार सुरु
By महेश गायकवाड | Published: February 21, 2023 05:18 PM2023-02-21T17:18:03+5:302023-02-21T17:18:40+5:30
मुख्यमंत्री सहायता निधी आणि समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांच्या मदतीतून त्याच्यावर लवकरच उपचार करण्यात येणार आहे.
जालना : प्रजासत्ताक दिनी शाळेत लोकशाहीवर भाषण करणाऱ्या अंबड तालुक्यातील रेवलगावच्या भोऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरला झाला अन् तो राज्यभरात प्रसिद्ध झाला. राजकीय नेते, अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांना त्याला भेटण्याचा मोह आवरला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भोऱ्याची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान कार्तिकला दृष्टिदोष असल्याचे समोर आले.
समृद्धी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी कार्तिकचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून त्याला उपचारासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार मंगळवारी समृद्धी कारखान्याच्या संचालिका वैशाली घाटगे यांनी कार्तिकला मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. रुग्णालयात तपासणीसाठी नेले. या ठिकाणी प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी कार्तिकच्या डोळ्याच्या तपासण्या केल्या.
मुख्यमंत्री सहायता निधी आणि समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांच्या मदतीतून त्याच्यावर लवकरच उपचार करण्यात येणार आहे. समृद्धी साखर कारखाना त्याच्या पुढील शिक्षणाचा खर्च उचलणार असल्याचे वैशाली घाटगे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनीदेखील त्याला वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून उपचार करण्याचा शब्द दिला होता. मंगळवारी समृद्धी कारखान्याच्या संचालिका वैशाली घाटगे यांनी कार्तिकला मुंबईतील जे.जे. रुग्णालयात नेऊन डोळ्यांच्या तपासण्या केल्या.
लवकरच पुढील उपचार
कार्तिक वजीर लहानपणापासून दृष्टिदोषाने त्रस्त असल्याचे त्याचे वडील जालिंदर वजीर यांनी सांगितले होते. कार्तिकच्या उपचाराचा सर्व खर्च समृद्धी शुगर इंडस्ट्रीज करणार आहे. तपासणीचे रिपोर्ट आल्यानंतर पुढील उपचार करण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
सतीश घाटगे, चेअरमन, समृद्धी शुगर्स