...अखेर निम्न प्रकल्पातून परभणीकडे झेपावले पाणी; स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 12:36 PM2024-05-23T12:36:43+5:302024-05-23T12:37:54+5:30

धरणाचे सहा दरवाजे उघडून नदी पात्रातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

...Finally the water rushed from the lower project to Parabhani; Local farmers continued to protest | ...अखेर निम्न प्रकल्पातून परभणीकडे झेपावले पाणी; स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध कायम

...अखेर निम्न प्रकल्पातून परभणीकडे झेपावले पाणी; स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध कायम

परतूर (परभणी) : तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पातून परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. अखेर बुधवारी दुपारनंतर धरणाचे सहा दरवाजे उघडून नदी पात्रातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणातीलपाणी परभणीकडे झेपावले आहे. दरम्यान स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असताना पाणी सोडल्यामुळे नाराजीचा सूर दिसून येत आहे.

निम्न दुधना प्रकल्पात केवळ आता मृत साठा शिल्लक आहे. या मृत साठ्यातूनच परभणी जिल्ह्यातील जनावरांच्या पिण्याचे पाणी व परिसरातील पाणीटंचाई निवारण्यासाठी धरणातून दुधना नदीच्या पात्रातून बुधवारी दुपारी ३:३० वाजता धरणाचे ६ दरवाजे ०.५० मीटरने उघडून ५ हजार ३४६ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, नदी पात्रात पूर परिस्थिती निर्माण होणार असल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांनी जीवित, वित्त हानी होऊ नये याची काळजी घ्यावी, असे आवाहन धरण प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या विरोधानंतरही सोडले पाणी.
धरण मृत साठ्यात आल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी पात्रातून पाणी सोडण्यास विरोध केला होता. मात्र, विरोधाला न जुमानता शासनाने आदेश देऊन सदरील पाणी सोडले आहे. पाणी सोडण्यात येऊ नये यासाठी युवा नेते नितीन जेथलिया, दादाराव खोसे, बाजीराव खरात, अंशीराम कबाडी, आसाराम लाटे, शिवाजी लाटे, गणेश राजबिंडे, बाबासाहेब लाटे, माउली घेंबड, कैलास बिडवे, हरिभाऊ आकात, आदी शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला होता.

पाण्याचा अपव्यय होऊ नये - नितीन जेथलिया
युवा नेते नितीन जेथलिया म्हणाले की, टंचाई निवारण्यासाठी पाणी सोडण्यासाठी आमचा विरोध नाही. मात्र, नदीपात्रातून सोडण्यात येणारे पाणी हे मोठ्या प्रमाणात वाया जाणार आहे. धरण मृत साठ्यावर गेलेले आहे. त्यामुळे टँकरद्वारे हे पाणी घ्यावे व किमान १ जूनपर्यंत तरी पाणी सोडू नये, अशी आमची मागणी नितीन जेथलिया यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: ...Finally the water rushed from the lower project to Parabhani; Local farmers continued to protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.