....अखेर ग्रामस्थांना मिळाले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:29 AM2021-05-16T04:29:07+5:302021-05-16T04:29:07+5:30
बातमीचा परिणाम : गटविकास अधिकाऱ्यांची भेट, आरोग्य विभागाचे पथक दाखल परतूर : परतूर तालुक्यातील बाबुलतारा येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती ...
बातमीचा परिणाम : गटविकास अधिकाऱ्यांची भेट, आरोग्य विभागाचे पथक दाखल
परतूर : परतूर तालुक्यातील बाबुलतारा येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. त्यातच कोरोनाच्या रुग्णसंख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होते. याबाबत लोकमतने गुरुवार व शनिवारच्या अंकात वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्तानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून, गावाला पाणीपुरवठा करण्यात आला आहे. दुसरीकडे रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य पथकही दाखल झाले असून, ग्रामस्थांची तपासणी सुरू केली आहे.
तालुक्यातील बाबुलतारा गावात कोरोनाने कहर केला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत ९ जणांना आपला जीव गमवावा लागला. शिवाय ५० जणांना कोरोनाची लागण देखील झाली आहे. त्यातच ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. वाढती रुग्णसंख्या व असलेली पाण्याची टंचाई यामुळे ८० टक्के लोक शेतात राहण्यासाठी गेले आहेत. याबाबत लोकमतने गुरुवार व शनिवारच्या अंकात वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्तानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. गावात आरोग्य पथक तैनात करण्यात आले असून, प्रत्येकाची कोरोनाची चाचणी केली जात आहे. कोरोनाग्रस्तांना आंबा येथील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर ग्रामपंचायतीने पाईपलाईनची जोडणी करून गावात पाणीही सोडले आहे. शिवाय गावात औषध फवारणीही करण्यात आली आहे. ग्रामसेविका जगधने या गावात हजर झाल्या आहेत.
बाबुलतारा या गावातील परिस्थिती नियंत्रणात आहे. गावात औषधी फवारणी करण्यात आली आहे. आरोग्य पथकाला योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाग्रस्तांना आंबा येथील कोविड सेंटरमध्ये हलविण्यात आले आहे.
अंकुश गुंजकर, गटविकास अधिकारी, परतूर
बाबुलतारा १२०० लोकसंख्येचे गाव असून, आतापर्यंत २२५ लोकांची तपासणी करण्यात आली. त्रास असलेल्या लोकांची काळजी घेण्यात येत आहे.
डॉ. सय्यद जाहेद, तालुका आरोग्य अधिकारी, परतूर