...अखेर परभणीकडे जाणारे पाणी थांबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 12:56 AM2018-05-17T00:56:03+5:302018-05-17T00:56:03+5:30
निम्न दुधना प्रकल्पातून मागील नऊ दिवसापासून परभणीकडे सुरू असलेला पाण्याचा विसर्ग बुधवारी थांबवण्यात आला असून, आता धरणात केवळ २०.५ टक्के जिवंत पाणीसाठा राहीला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : निम्न दुधना प्रकल्पातून मागील नऊ दिवसापासून परभणीकडे सुरू असलेला पाण्याचा विसर्ग बुधवारी थांबवण्यात आला असून, आता धरणात केवळ २०.५ टक्के जिवंत पाणीसाठा राहीला आहे.
परभणी व पूर्णा शहराची तहान भागवण्यासाठी या निम्न दुधना प्रकल्पातून खाली पात्रात पाणी सोडण्यात आले होते. फेबु्रवारी महिन्यातच परभणी व पूर्णा या शहरावर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले होते.
शहराच्या पाणी टंचाई निवारणार्थ या प्रकल्पातून तिसऱ्यांदा पाणी सोडण्यात आले आहे. ८ मे रोजी सायंकाळी ५ वाजता चार दरवाजातून सुरू करण्यात आलेला विसर्ग बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास थांबविण्यात आला. यामुळे आता या धरणात २०.५ टक्के जिवंत साठा आहे तर एकूण ४५ टक्के पाणीसाठा आहे.
या धरणावर परतूर सेलूसह अनेक खेड्यांची तहान अवलंबून आहे. त्यामुळे या धरणातील पाण्याचा अवैध उपसा व अपव्यय टाळणे गरजेचे आहे.
निम्न दुधना प्रकल्प हा ख-या अर्थाने जालना जिल्ह्यात असला तरी त्याचा प्रत्यक्ष लाक्ष हा प्रारंभीपासूनच परभणी, नांदेड जिल्ह्यातील काही भागाला होत आहे. जालना जिल्ह्याला या प्रकल्पातील केवळ बॅकवॉटरवर समाधान मानावे लागत आहे. आतापर्यंत या प्रकल्पावर जवळपास १ हजार कोटीपेक्षा अधिक खर्च झालेला आहे. यामुळे जालना जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष भरून निघाल्यासारखे दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र हा प्रकल्प परभणी जिल्ह्यासाठी त्यावेळी तयार करण्यात आला होता की काय अशी शंका व्यक्त आहे. जेवढे पाणी सध्या शिल्लक आहे ते आता परतूर तालुक्यासाठी राखून ठेवण्याची मागणीही शेतक-यांनी केली आहे.