अखेर पारध- पिंपळगाव रेणुकाई रस्त्याचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:27 AM2020-12-24T04:27:45+5:302020-12-24T04:27:45+5:30
नागरिकांतून समाधान : पारध : भोकरदन तालुक्यातील पारध ते पिंपळगाव रेणुकाई या पाच किलोमीटर राज्य मार्गाची दुरवस्था झाली ...
नागरिकांतून समाधान :
पारध : भोकरदन तालुक्यातील पारध ते पिंपळगाव रेणुकाई या पाच किलोमीटर राज्य मार्गाची दुरवस्था झाली होती. याबाबत लोकमतने १ डिसेंबर रोजी ‘पिंपळगाव रेणुकाई- पारध राज्य मार्गाचे काम रखडले’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन संबंधित विभागाने रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे.
पिंपळगाव रेणुकाई ते पारध या पाच किलोमीटरच्या राज्य मार्गाची दुरवस्था झाली आहे. वाहनधारकांना वाहने चालवताना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे, हा रस्ता काही महिन्यापूर्वी खोदून यावर खडीदेखील टाकण्यात आली होती. मात्र, निधी उपलब्ध नसल्याने काम रखडले होते. भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई ते पारध हा रस्ता विदर्भ व खान्देशाला जोडणारा महत्त्वाचा राज्यमार्ग आहे. या रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. दोन वर्षापूर्वी जुई धरण फाटा ते वरुड फाट्यापर्यंतच्या रस्त्याचे काम करण्यात आले. यावेळी पिंपळगाव रेणुकाई ते पारध या रस्त्याचे कामदेखील सुरू करण्यात आले. काही दिवस कामही सुरू होते. परंतु, त्यानंतर काम बंद पडल्याने रस्त्यावर दोन-दोन फुटाचे खड्डे पडले होते. पिंपळगाव रेणुकाई, पारध व वालसावंगी ही तालुक्यातील मोठी गावे आहेत. त्यांच्याशी अनेक गावांचा संपर्क येतो. त्यामुळे येथे येणाऱ्यांची संख्याही मोठी असते. या रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. वृत्तानंतर संबंधित विभागाला जाग आली असून, रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
काम सुरू झाल्याने समाधान
पारध ते पिंपळगाव रेणुकाई या रस्त्यावरून वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत होती. त्यामुळे वाहनांचे मेन्टेनन्सदेखील वाढले होते. सध्या रस्त्याच्या कामाला सुरूवात झाल्याने दिलासा मिळाला आहे. काम दर्जेदार केले जावे.
प्रदीप देशमुख, वाहनचालक पारध बुद्रूक
फोटो ओळी :
पारध ते पिंपळगाव रेणुकाई या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.