जालन्यात मृत पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला पोलिसांकडून आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 08:08 PM2018-12-20T20:08:00+5:302018-12-20T20:09:05+5:30
पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गिरी यांच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला होता.
जालना : जालना जिल्हा पोलीस दलातील पोलीस कर्मचारी राजेंद्र मोहन गिरी (३७) यांचे काही दिवसांपूर्वीच आकस्मिक निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांना जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यावतीने आर्थिक मदत देण्यात आली.
मंठा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक राजेंद्र गिरी यांचे २६ आॅक्टोबर रोजी आकस्मित निधन झाले. त्यामुळे गिरी यांच्या कुटुंबावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला होता. त्यातूनच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गिरी यांच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला होता. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून जमा केलेल्या १ लाख ३ हजार रुपयाची आर्थिक मदत पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या हस्ते मयत पोलीस कर्मचारी राजेंद्र गिरी यांच्या पत्नी मंजुश्री गिरी यांना सुपूर्द करण्यात आली आहे.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, पोलीस उपाधीक्षक (मुख्यालय) सोपानराव बांगर यांच्यासह दुर्गादास गिरी, मुलगा रुद्र व नातेवाईक आणि अधिकारी - कर्मचारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. आर्थिक मदत जमा करण्यासाठी पोलीस कर्मचारी संजय सोनवणे यांनी पुढाकार घेऊन प्रत्यक्ष व सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिकारी- कर्मचारी यांच्यापर्यंत पोहोचून मदतीसाठी प्रयत्न केले.