आर्थिक व्यवहारातून तरुणाला जिवंत जाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 12:11 AM2018-01-09T00:11:14+5:302018-01-09T00:11:21+5:30
बीड जिल्ह्यातील सामनापूर येथील अनंत श्रीकांत इंगोले (२८) या तरुणास हात-पाय बांधून जिवंत जाळल्याची घटना रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास शहागड-पाथरवाला रस्त्यावरील कुरण फाट्यावर घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
शहागड (जि.जालना) : बीड जिल्ह्यातील सामनापूर येथील अनंत श्रीकांत इंगोले (२८) या तरुणास हात-पाय बांधून जिवंत जाळल्याची घटना रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास शहागड-पाथरवाला रस्त्यावरील कुरण फाट्यावर घडली. २१ लाखांच्या आर्थिक व्यवहारातून ही घटना घडल्याचे मृताच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. याप्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनंत हा औरंगाबाद येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. रविवारी सायंकाळी धुमाळ (पूर्ण नाव नाही) व अन्य दोघांसोबत कारने घरी येत असल्याचे त्याने नातेवाईकांसह ग्रामसेवक मित्र तुकाराम घोलप यांना सांगितले होते. रात्री साडेनऊ वाजेपर्यंत तो घरी न आल्यामुळे घोलप यांनी त्याच्याशी मोबाईलवर संपर्क केला. काही जणांसोबत पाचोडजवळ ढाब्यावर जेवत असल्याचे त्याने सांगितले. बारा वाजले तरी अनंत न आल्याने घोलप यांनी पुन्हा त्याच्याशी संपर्क केला. सोबत असलेल्यांपासून माझ्या जिवाला धोका असल्याचे घाबरत त्याने सांगितले. त्यानंतर त्याच्याशी संपर्क झाला नाही.
मारेकºयांनी अनंतला हात-पाय बांधून रस्त्यावरच जिवंत जाळल्याचा संशय आहे. रात्री दीडच्या सुमारास समर्थ सहकारी साखर कारखान्याचा एक सुरक्षारक्षक कारखान्याकडे जात ंअसताना, त्याने रस्त्यावर एक व्यक्ती जळत असल्याचे पाहिले. सुरक्षारक्षकाने लगेच गोंदी पोलिसांना कळविले.
गोंदी ठाण्याचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे, उपनिरीक्षक विकास कोकाटे, सहाय्यक निरीक्षक सय्यद नासेर तत्काळ घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी आग विझवली. त्यानंतर घटनास्थळ सील केले.
अनंतच्या जळणा-या शरिराच्या बाजूलाच पॅनकार्ड, आधार कार्ड, एटीएम व अन्य काही कागदपत्रे आढळून आली. त्या आधारे पोलिसांनी सामनापूर पोलीस पाटलांशी संपर्क केला. सामनापूरचे पोलीस पाटील आनंदराव गोरे अनंतच्या नातेवाइकांना घेऊन जीपने घटनास्थळ गाठले. त्यांनी अर्धवट जळालेले जॅकेट व शरीर रचनेहून हा मृतदेह अनंतचा असल्याचे पोलिसांना सांगितले.
अंबडचे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सोनवणेही घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शहागड आरोग्य केंद्रात पाठवला.
या प्रकरणी अनंतचे चुलते भास्कर इंगोले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोंदी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनंतचे पदव्युत्तर शिक्षण झाले होते. तो वासनवाडी (ता.जि. बीड) येथील ग्रामपंचायत कार्यालयात आॅपरेटर म्हणून काम करण्याबरोबरच नेट कॅफेही चालवायचा. पॅन कार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड तयार करून देण्याचे कामही तो करत होता. काही दिवसांपूर्वी त्याने पैसे जमवून व नातेवाइकांडून उसने पैसे घेऊन धुमाळ (पूर्ण नाव नाही) नावाच्या व्यक्तीसोबत भाग्ीदारीत हायवा ट्रक घेतला होता व तो मुंबईत एका खासगी कंपनीमध्ये कराराने दिला होता. मात्र, कंपनी बंद झाल्याने ट्रक विकून उधारी चुकविणार असल्याचे त्याने नातेवाईकांनी सांगितले होते. आॅपरेटरचे काम सोडून दोन महिन्यांपूर्वी त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करायची म्हणून औरंगाबादला खासगी शिकवणीमध्ये प्रवेश घेतला होता, अशी माहिती चुलते भास्कर इंगोले यांनी दिली.
घटनेपूर्वी भावाला एसएमएस
अनंतने घटना घडण्यापूर्वी पुणे येथे इंजिनिअर असलेला मोठा भाऊ गोविंद इंगोले यास एसएमएसकरून धुमाळ व अन्य एक व्यक्ती माझ्यासोबत आहे. त्यांच्याकडून मला २१ लाख रुपये मिळणार आहेत. मात्र, त्यांचे वर्तन ठीक नसून माझ्या जिवाला धोका असल्याचे एसएमएसद्वारे कळविले होते.