महाव्यवस्थापकांकडून रेल्वे अधिकाऱ्यांची झडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 12:04 AM2019-03-17T00:04:40+5:302019-03-17T00:05:04+5:30
मुंबई येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्ये रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन माल्ल्या यांनी शनिवारी जालना येथील रेल्वे स्थानकाची पाहणी करुन अधिकारी, कर्मचाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेऊन सूचना दिल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मुंबई येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्ये रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन माल्ल्या यांनी शनिवारी जालना येथील रेल्वे स्थानकाची पाहणी करुन अधिकारी, कर्मचाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेऊन सूचना दिल्या.
माल्ल्या यांनी रेल्वे स्थानकात प्रवाशांसाठी नव्यानेच उभारण्यात आलेल्या पुलाची पाहणी केली. तसेच मालधक्का, वेटिंग रुम, पार्किंग यावेळी पाहणी केली. तसेच जालना रेल्वे संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन त्यांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले. मुंबई येथे रेल्वेचा लोखंडी पूल कोसळून झालेल्या अपघातात सहाजणांना जीव गमवावा लागला, तर अनेकजण जखमी झाले आहेत. यामुळे रेल्वे प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेण्यात येत असल्याचे यावेळी माल्ल्या म्हणाले. माल्या यांनी रेल्वे स्थानकातील दाद-याची बारकाईने पाहणी केली. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या सूचना दिल्या. जुलै महिन्यापर्यत येथील रेल्वेस्थानकात सीसीटीव्ही बसविण्यात येणार असल्याचे यावेळी माल्या यांनी सांगितले. लवकरच रेल्वेची भरती पूर्ण होणार असून आवश्यक त्या रेल्वेस्थानकात सुरक्षा पुरविण्यात येईल. यात जालन्याचा सुध्दा समावेश असणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी रेल्वे संघर्ष समितीचे महासचिव फेरोज अली, बाबुूराव सतकर, छोटे खॉ पठाण, अशोक मिश्रा रेल्वेचे बी. विश्वनाथ, नीलकांता रेड्डी, राजेश शिंदे आदींची उपस्थिती होती.
गेट क्रमांक ७८ काम होणार
यावेळी रेल्वे संघर्ष समिती पदाधिका-यांनी रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन माल्या यांची भेट घेऊन मागणी निवेदन दिले. वाढत्या प्रवाशांची गर्दी बघता येथील स्थानकामधील चौथ्या क्रमांकाचा प्लॅटफॉर्म सुरु करुन प्रवाशांची गैरसोय दूर करावी, तसेच गेट क्रमांट ७८ च्या भुयारी मार्गाचे काम तातडीने मार्गी लावावे, मुंबईला जाण्यासाठी नांदेड ते मुंबई रेल्वे सुरु करण्याची मागणी यावेळी रेल्वे संघर्ष समितीच्या पदाधिका-यांनी यावेळी माल्ल्ला यांना केली.
या मागणीवर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन माल्ल्या यांनी दिले.