पोलीस निरीक्षकाविरूद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 12:25 AM2018-06-17T00:25:48+5:302018-06-17T00:25:48+5:30
सदर बाजार पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुनील काकडे यांच्याविरूद्ध १० हजार रूपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुनील काकडे यांच्याविरूद्ध १० हजार रूपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.
सुनील काकडे यांनी एका तक्रारदाराकडे गुन्हा दाखल न करण्यासाठी प्रारंभी ३० हजार रूपयांची मागणी केली होती. नंतर तडजोड होऊन १० हजार रूपये तक्रारदाराने द्यावे असे निश्चित झाले होते. ही लाच नेमकी कुठे स्वीकारणार याचा तपशील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी गुरूवारी सदर बाजार पोलीस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल श्रीकृष्ण रामदास राऊत यांच्या विरूद्ध सापळा लावला. त्यावेळी कॉलर माईक, रेकॉर्डचा उपयोग करण्यात आला. परंतु राऊत याला शंका आल्याने त्याने पंचाच्या गळ्यातील कॉलर माईक हिसकावून घेऊन सदर बाजार पोलीस ठाण्यातून पोबारा केला होता.
दरम्यान सापळा रचताना जी काही थोडीफार तथ्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागली, त्यानुसार पोलीस निरीक्षक काकडे आणि कृष्णा राऊत संबंधित तक्रारदाराकडून १० हजार रूपयांची लाच जुन्या मोंढ्याच्या प्रवेशद्वाराजवळ स्वीकारणार असल्याचे उघड झाले. यावरून शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जालना शाखेने सदर बाजार ठाण्याचे निरीक्षक सुनील काकडे याच्या विरूद्ध कलम ७, १२ तसेच कलम ३९२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
अद्याप या दोन्ही संशयीत आरोपींना अटक झाली नसल्याची माहिती लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक रवींद्र निकाळजे, पो. नि. आदिनाथ काशीद यांनी सांगितले. या प्रकारामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.