भोकरदन येथील खंडणीप्रकरणी चार जणांविरुध्द गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 12:09 AM2019-05-09T00:09:15+5:302019-05-09T00:09:47+5:30
येथील हॉटेल मालकाला मारहाण करून दीड लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी भोकरदन पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली असून, त्यांचा एक साथीदार फरार झाला आहे.
भोकरदन : येथील हॉटेल मालकाला मारहाण करून दीड लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी भोकरदन पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली असून, त्यांचा एक साथीदार फरार झाला आहे.
५ मे रोजी रात्री साडेअकरा वाजता आरोपी जगदीश भीमराव कामकर (२४, रा. भोकरदन), विजय चिंचपुरे (२२, रा. वाकडी), शेख मुक्तार शेख मुश्ताक (२४, रा. भोकरदन), कृष्णा मधुकर घोडके (२४, रा. भोकरदन) हे फियार्दीच्या सिल्लोड रोडवरील राजस्थानी हॉटेल येथे जेवण करण्यासाठी गेले होते. तेव्हा फियार्दीने हॉटेल बंद करण्याची वेळ झाली असून, लवकर जेवण आटोपा असे त्यांना सांगितले. यावरुन आरोपींनी हॉटेल मालक ओमप्रकाश सावडा, त्यांचा भाऊ व साथीदारांना लथा बुक्क्याने मारहाण केली.
याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असताना आरोपींनी त्यांना अडवून तुमच्या विरोधात खोटी तक्रार देतो असे म्हणून ५ लाख रुपयांची खंडणी मागीतली. शेवटी दीड लाखाची तडजोड करण्यात आली. याप्रकरणी ओमप्रकाश लिछाराम सावडा यांच्या फियार्दीवरुन भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापैकी तीन आरोपींना मंगळवारी रात्री अटक करण्यात आली असून, आरोपी विजय चिंचपुरे फरार आहे. या तिघांना भोकरदन न्यायालयात हजर केले असता अटींवर जामीन मंजूर करण्यात आला. तपास पोनि. चंदन इमले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. लक्ष्मण सोंने करीत आहेत.