बदनापूर तहसील कार्यालयात आग; निवडणूक विभागातील कागदपत्रे जळाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 01:41 PM2020-06-25T13:41:58+5:302020-06-25T13:49:26+5:30
आगीत निवडणूक विभागाचे मोठे नुकसान झाले आहे.
बदनापूर - येथील तहसील कार्यालयात गुरुवारी पहाटे ५ वाजेच्या दरम्यान आग लागली. आगीत निवडणूक विभागाचे नुकसान झाले आहे. येथील सामानासह कागदपत्रे जळाची माहिती आहे. शॉर्ट-सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
बदनापूर तहसील कार्यालयात निवडणूक विभागात दि. 25 जून रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. त्यामध्ये या विभागातील संगणक, झेरॉक्स मशीन, तालुक्यातील अनेक निवडणुकांची कागदपत्रे जळाली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज असला तरीही नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी चौकशी करण्याची मागणी होत आहे. आगीची माहिती मिळताच तहसीलदार छाया पवार, नायब तहसिलदार, पेशकार व अन्य कर्मचारी यांनी कार्यालयात धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, आमदार नारायण कुचे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
याविषयी तहसीलदार छाया पवार यांनी सांगितले की, आग कशामुळे लागली याचा अंदाज अजून आलेला नाही. सकाळी ५ वाजता आग लागल्याबाबत येथील कोतवाल व कर्मचारी यांनी आम्हाला कळवले. जालना येथून अग्निशामक दलाची एक गाडी व येथील काही खाजगी टँकरच्या साहाय्याने ही आग विझाविण्यात आली. आगीमुळे निवडणुक विभागातील कागदपत्रे व सामान जळाले आहे.