कंटेनरला आग; ५२ खाटा खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 12:44 AM2019-08-05T00:44:53+5:302019-08-05T00:45:43+5:30
दिल्लीहून केरळ राज्यातील रूग्णालयात खाटा घेऊन निघालेल्या मालवाहतूक कंटेनरला अचानक आग लागली. या आगीत ५२ खाट जळून खाक झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वडीगोद्री : दिल्लीहून केरळ राज्यातील रूग्णालयात खाटा घेऊन निघालेल्या मालवाहतूक कंटेनरला अचानक आग लागली. या आगीत ५२ खाट जळून खाक झाले. ही घटना रविवारी सायंकाळी अंबड तालुक्यातील धाकलगाव येथे घडली.
एक मालवाहतूक कंटेनर (क्र. एच.आर.५५-आर.७७३६) दिल्ली येथून केरळ राज्यातील रूग्णालयासाठी खाटा घेऊन जात होता. हा कंटेनर रविवारी सायंकाळी जालना - वडीगोद्री राष्ट्रीय महामार्गावरील धाकलगाव येथे आला असता अचानक वायरिंगमध्ये बिघाड होऊन आग लागली.
ही बाब लक्षात येताच चालकाने धाकलगावातील एका दुकानासमोर वाहन उभा केले. मुस्ताक पठाण, महेबूब पठाण व ग्रामस्थांनी कंटेनरला लागलेली आग विझवण्यासाठी घरातील पाणी आणले. तसेच टँकर मागवून आग विझविण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाच्या वाहनाने ही आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र, तोपर्यंत कंटेनरमधील अत्याधुनिक ५२ खाटा जळून खाक झाल्या. या आगीत लाखोंचे नुकसान झाले असून, सुदैवाने जीवित हानी झाली नाही.
गावातील टायगर ग्रुपचे सदस्य रिजवान पठाण, रौफ पठाण, सलीम पठाण, जुमान पठाण, पिंटू पवार, बशीर जोया, सलीम पठाण, निहाल पठाण, रईस शेख, अफरोज पठाण, फेरोज पठाण, भाऊसाहेब नाझरकर, सलीम पठाण, समर्थ कारखान्याचे सुरक्षा अधिकारी एफ.एम.दुगे, सी.बी.खरात, खैसर पठाण, नारायण खोजे, संजय राठोड यांच्यासह ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.