अग्निशमन विभागाला लागली समस्यांची ‘आग!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 12:49 AM2019-11-18T00:49:56+5:302019-11-18T00:50:30+5:30

जिल्ह्यात कार्यरत असलेल्या अग्निशमन विभागाच्या यंत्रणेला विविध समस्यांचे ग्रहण लागले आहे.

Fire department issues 'fire!' | अग्निशमन विभागाला लागली समस्यांची ‘आग!’

अग्निशमन विभागाला लागली समस्यांची ‘आग!’

googlenewsNext

जालना : कोठेही लागणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळविणे असो, अथवा पुरासह इतर नैसर्गिक आपत्तीतील बचाव कार्य असो, या कामात अग्निशमन दलाचे जवान महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, जिल्ह्यात कार्यरत असलेल्या अग्निशमन विभागाच्या यंत्रणेला विविध समस्यांचे ग्रहण लागले आहे. कुठे कर्मचाऱ्यांचा अभाव, कुठे इमारतीची दुरवस्था, तर कुठे साधनसामग्रीची कमतरता आहे. कार्यरत टीम या समस्यांवर मात करीत काम करीत आहेत. मात्र, संबंधितांची होणारी कसरत पाहता अग्निशमनच्या ‘समस्येची आग’ विझविण्यासाठी प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
इलेक्ट्रिकमुळे लागणारी आग विझविताना कसरत
शेषराव वायाळ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : येथील अग्निशमन विभागात कर्मचा-यांचा अभाव आहे, तर पेट्रोलियम आणि इलेक्ट्रिक कारणांमुळे आग लागली तर ती आग आटोक्यात आणण्यासाठी लागणारी यंत्रणा या विभागाकडे उपलब्ध नाही.
परतूर येथे अग्निशमन दलाची सुसज्ज इमारत आहे. सध्या या विभागात पाच कर्मचारी कार्यरत आहेत. आठ जागा मागील सहा वर्षापासून रिक्त आहेत. या पाच कर्मचांºयावर आग विझवण्यासह आपत्ती व्यवस्थापनाचे काम सुरू आहे. चालू वर्षात आगीच्या १३ घटना घडल्या होत्या. या घटनात या दलाने तत्परतेने जबाबदारी पार पाडली. तर चार ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाचे कार्य केले. या दलाकडे आपत्ती व्यवस्थापनाचे सर्व साहित्य आहे. मात्र, पेट्रोलियम व इलेक्ट्रीकल कारणांनी लागणारी आग विझवण्यासाठी लागणारे पुरेसे साहित्य या दलाकडे नाही. गम बूट, हेल्मेट, हँड ग्लोज आदी आवश्यक साहित्याचा अभाव आहे.
निजामकालीन इमारतीचा आधार...
विजय मुंडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना येथे कार्यरत असलेल्या अग्निशमन यंत्रणेतील सोयी-सुविधा मुबलक आहेत. मात्र, कार्यालयाची इमारत निजामकालीन असून, अधिकारी, कर्मचा-यांना त्या जीर्ण इमारतीतच रात्रंदिन थांबावे लागत आहे, तर इतर विभागाचे कर्मचारीही डेप्युटेशनवर या विभागात कार्यरत आहेत.
जालना येथे अग्निशमन दलात पाच वाहने कार्यरत आहेत. या विभागात सहा प्रशिक्षित फायरमन असून, इतर विभागातील डेप्युटेशनवर काम करणारे कर्मचारीही आहेत. आठ चालक असून, यातील तीन फायर विभागाचे असून, पालिका वाहतूक शाखेतील इतर चालक आहेत. कार्यालयाच्या आवारात पाण्याची सोय नसल्याने फिल्टरवरून पाणी भरून वाहने अग्निशमन दलाच्या कार्यालयात लावली जातात. पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने जवळच असलेल्या क्वॉटरमध्ये जाऊन अधिकारी, कर्मचारी तहान भागवित आहेत. मात्र, निजामकालीन इमारत जीर्ण झाल्याने त्याच इमारतीत दैनंदिन कामकाज करावे लागत आहे.
९३ ठिकाणी धावले अग्निशमनचे जवान
फकिरा देशमुख।
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : येथील नगरपालिकेंतर्गत कार्यरत असलेल्या अग्निशमन दलाच्या पथकाने गत सहा वर्षांत ९३ ठिकाणच्या विविध घटनांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहेत. यात ७३ घटनांमध्ये आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम या पथकाने केले आहे.
भोकरदन येथील अग्निशमन विभागाच्या अधिकाºयाचे पद रिक्त आहे. चालकासह तीन प्रशिक्षित कर्मचारी कार्यरत आहेत. चालू वर्षात या पथकाने आगीच्या १९, बचाव कार्याच्या १० तर पाच ठिकाणच्या बंदोबस्तात कर्तव्य बजावले आहे. तर २०१३ पासून आजवर आगीच्या ७३, बचाव कार्याच्या २० घटनांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
साफसफाई विभागातील कर्मचारी विझवितात आग
प्रकाश मिरगे।
लोकमत न्यूज नेटवर्क
जाफराबाद : जाफराबाद येथे अग्निशमन दलाचे वाहन आहे. मात्र, प्रशिक्षित कर्मचा-यांची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे पालिकेतील सफाई कामगार या वाहनावर काम करतात, तर अनेक प्रसंगात भोकरदन येथील वाहन बोलाविले जाते.
जाफराबाद नगर पंचायतीला शासनाकडून गेल्या दोन महिन्यापूर्वी एक अग्निशमन दलाचे वाहन उपलब्ध झाले आहे. मात्र प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त न केल्याने हे वाहन शोभेची वस्तू बनले आहे. नगर पंचायतीने कायम कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
मात्र अद्याप नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे नगर पंचायतीने खासगी कंपनीकडे प्रशिक्षित सहा कर्मचाºयांची तात्पुरत्या स्वरूपात मागणी केली आहे. सध्या नगर पंचायतीतील सफाई कामगार, कर्मचाºयांकडून काम करून घेतले जात आहे. मंगळवारी तहसील कार्यालयाच्या जुन्या इमारतीतील दोन खोल्यांना आग लागली होती. यावेळी येथील अग्निशमन दलाच्या वाहनाला वाहनाला अडचण असल्याने भोकरदन नगर परिषदेचे वाहन बोलावून व खासगी टँकरचा वापर करून ही आग अटोक्यात आणण्यात आली. ही स्थिती पाहता प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त करण्याची गरज आहे.

Web Title: Fire department issues 'fire!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.