गोठ्याला आग, बारा शेळ्यांचा होरपळून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 12:16 AM2018-01-07T00:16:53+5:302018-01-07T00:17:03+5:30
अंबड तालुक्यातील एकनाथनगर येथील एक पत्र्याचे घर व गोठ्याला शनिवारी पहाटे अचानक आग लागली. या आगीत गोठ्यातील बारा शेळ्यांसह एका वासराचा होरपळून मृत्यू झाला.
वडीगोद्री : अंबड तालुक्यातील एकनाथनगर येथील एक पत्र्याचे घर व गोठ्याला शनिवारी पहाटे अचानक आग लागली. या आगीत गोठ्यातील बारा शेळ्यांसह एका वासराचा होरपळून मृत्यू झाला. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही.
वडीगोद्री येथील शेतकरी पांडुरंग रामचंद्र काळे यांचे वडीगोद्री-धाकलगाव शिवारात पत्र्याचे घर व घराला लागून गोठा आहे. गोठ्यात ३२ शेळ्या बांधलेल्या होत्या. तसेच एक म्हशीचे वासरूही होते.
पहाटे चार वाजेच्या सुमारास गोठ्याला अचानक आग लागली. त्यामुळे शेळ्यांचा आवाज आल्याने पांडुरंग काळे, त्यांच्या पत्नी, सुलभा, मुली श्रद्धा व पल्लवी यांना जाग आली. घराला लागूनच गोठा असल्याने सर्व जण बाहेर पळाले. काळे यांनी आरडाओरड केळ्यामुळे शेजारी धावत आले. त्यांनी शेजा-यांच्या मदतीने वीस शेळ्यांचा जीव वाचवला. मात्र, १२ शेळ्या व एका वासराचा होरपळून मृत्यू झाला. घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या घटनेत काळे यांचे दीड लाखाचे नुकसान झाले. घर जळाल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला. तलाठी एन.एन. पठाण यांनी पंचनामा केला.