भोकरदन येथे जिनिंगला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 01:05 AM2018-04-25T01:05:20+5:302018-04-25T01:05:20+5:30
भोकरदन - सिल्लोड रस्त्यावरील सिध्दार्थ फायबरर्स जिनिग प्रेसिग व आॅईल मिलला सकाळी अचानक आग लागल्यामुळे ७० ते ८० लाख रूपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : भोकरदन - सिल्लोड रस्त्यावरील सिध्दार्थ फायबरर्स जिनिग प्रेसिग व आॅईल मिलला सकाळी अचानक आग लागल्यामुळे ७० ते ८० लाख रूपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. आग विझविण्यासाठी जालना व भोकरदन येथील अग्निशामक दलाचे दोन बंब आटोकाट प्रयत्न करीत होते.
सिध्दार्थ फायबर्सचे संचालक राजेद्र जैन बाकलीवाल यांनी भोकरदन पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मंगळवारी सकाळी ७ ते ८ वाजेच्या दरम्यान जिनिंगमध्ये कापूस गाळप करण्याचे काम सुरू असताना अचानक आग लागली. ही आग आॅईल मिलच्या भागात गेल्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या सरकीच्या ढेपेने पेट घेतला. यात ३५० टन ढेप जळून खाक झाली शिवाय ४० क्विटंल सरकी व १५० ते २०० कापसाच्या गटाना या आगीत जळून खाक झाल्या. त्यामुळे या आगीमध्ये ७० ते ८० लाख रूपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत असुन, ही आग सिध्दार्थ फायबरर्सच्या आॅईल मिलच्या भागात पसरल्यामुळे या ठिकाणी दोन गोदामात साठविलेल्या सरकीच्या ढेपेने पेट घेतला, त्यामुळे आग आटोक्यात येण्यास उशीर होत झाल्याचे सांगण्यात आले. ही आग विझविण्यासाठी भोकरदन नगरपरिषदेचा अग्निशामक दलाचा बंब सकाळी ८ वाजता जिनिगमध्ये दाखल झाला होता, मात्र आगीचे स्वरूप मोठे असल्यामुळे जालना नगरपरिषदेचा दुसरा अग्निशामक बंब मागविण्यात आला होता. दोन्ही अग्निशामक दलाचे कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. रात्री उशिरापर्यंत ही आग धुमसत होती. या प्रकरणात भोकरदन पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे.
आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
भोकरदन शहरातील सिध्दार्थ फायबरर्स जिनिग प्रेसिगला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी भोकरदन व जालना नगरपरिषदेचे कर्मचारी शंशीकात सरकटे, सोमनाथ बिरारे, कैलास जाधव, परसराम ढोके, रमेश खरात, रईस कादरी, गणपत काटकर, सुरज दास, मदीम चौधरी हे कर्मचारी प्रयत्न करीत असुन सायंकाळपर्यंत आग आटोक्यात आल्याचे कर्मचा-यानी सांगितले़