जालना पालिकेच्या मालत्ता कर विभागाला आग; दस्तावेज, साहित्य जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:35 PM2021-04-29T16:35:16+5:302021-04-29T16:36:24+5:30
मध्यरात्रीच्या सुमारास पालिकेच्या मालमत्ता विभागाला आग लागली.
जालना : शहरातील नगर पालिका कार्यालयातील मालमत्ता कर विभागाला लागलेल्या आगीत दस्ताऐवजासह इतर साहित्य जळून खाक झाले. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली असून, या प्रकरणी कदीम पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
नगर पालिकेतील कर्मचारी बुधवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे काम झाल्यानंतर कार्यालय बंद करून गेले होते. परंतु, मध्यरात्रीच्या सुमारास पालिकेच्या मालमत्ता विभागाला आग लागली. आगीची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच अग्निशमन दलाचे वाहन बोलावून आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत मालमत्ता कर विभागातील दस्ताऐवज जळून खाक झाले. घटनास्थळाला मुख्याधिकारी नितीन नार्वेकर व इतर अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचे प्रथम दर्शनी सांगण्यात येत आहे.
तीन सुरक्षा रक्षक निलंबीत
नगर पालिका कार्यालय परिसराच्या सुरक्षेसाठी तीन सुरक्षा रक्षक बुधवारी रात्री कार्यरत होते. ही आग लागल्यानंतर वेळीच लक्ष न दिल्याने आतील साहित्य, दस्ताऐवज जळून खाक झाले आहेत. या घटनेनंतर पालिकेने तीन सुरक्षा रक्षकांवर निलंबनाची कारवाई केली आहे.