बुलेटस्वारांना 'फटाका' राईड पडली महागात; सायलेन्सर जप्त, दंडही भरावा लागला
By दिपक ढोले | Published: April 6, 2023 04:41 PM2023-04-06T16:41:43+5:302023-04-06T16:42:44+5:30
भोकरदन नाका परिसरात पोलिसांनी विशेष मोहीम राबवून केली कारवाई
जालना : फटाके फोडत गाड्या पळविणाऱ्या सात बुलेटस्वारांवर शहर वाहतूक पोलिसांनी गुरुवारी कारवाई केली. त्यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड आकारून सायलेन्सर जप्त करण्यात आले आहेत.
शहरात कर्णकर्कश हॉर्नवर फाट... फाट...असा फटाके फोडल्याचा आवाज करत गाड्या पळवून शांतता भंग करण्याचे प्रमाण वाढले आहे. अवैधरीत्या बसविण्यात आलेल्या कर्कश हॉर्न व सायलेन्सरमुळे ध्वनिप्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. या आवाजामुळे शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत होता. शहर वाहतूक शाखेने गुरुवारी सकाळी भोकरदन नाका परिसरात एक तास विशेष मोहीम राबवून १३ बुलेटस्वारांची तपासणी केली. त्यात ७ बुलेट वाहनांना मॉडीफाय केलेले सायलेन्सर बसविल्याचे आढळून आले. त्यांच्यावर कारवाई करून दंड आकारण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक गुणाजी शिंदे यांनी दिली. ही कारवाई पोलिस निरीक्षक गुणाजी शिंदे, सपोनि. प्रतापसिंग बहुरे, पोउपनि. वाघ, सपोउपनि. निर्मल, पोकॉ. सुलाने, पोहेकॉ. बनसोड यांनी केली.