जालन्यात पुन्हा गोळीबार; दारुड्याचा बाजारात गावठी कट्टा घेऊन गोंधळ, गोळीबारात तरुण जखमी
By दिपक ढोले | Published: December 21, 2023 05:39 PM2023-12-21T17:39:02+5:302023-12-21T17:41:11+5:30
तरुणावर गोळीबार केल्यानंतर ग्रामस्थांनी आरोपीस ठेवले बांधून
जालना : दारू पिऊन आठवडी बाजारात हातात गावठी पिस्टल घेऊन गोंधळ घालणाऱ्याने समजून सांगण्यास गेलेल्या तरूणाच्या पोटात गोळी झाडल्याची घटना घनसावंगी तालुक्यातील पानेवाडी येथे गुरूवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. अमोल पांडुरंग शिंदे (३५ रा. पानेवाडी, ता. घनसावंगी) असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. त्याला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रूग्णालयात पाठविण्यात आले आहे.
घनसावंगी तालुक्यातील पानेवाडी येथे गुरूवारी आठवडी बाजार असतो. दुपारी दोन वाजेच्या सुमारास संशयित कुमार शिंदे नावाचा युवक दारू पिऊन हातात गावठी पिस्टल घेऊन गोंधळ करीत होता. त्याचवेळी त्याला गावातील काही तरूण समजवून सांगण्यास गेले. त्याचवेळी त्याने अमोल शिंदे याच्या पोटात गोळी झाडाली. त्यानंतर ग्रामस्थांनी तातडीने आठवडी बाजार बंद करून घनसावंगी पोलिसांना याची माहिती दिली. तर जखमीला तातडीने घनसावंगी येथील रूग्णालयात पाठविण्यात आले होते. तेथून जालना येथे रेफर करण्यात आले. परंतु, पोटात गोळी लागल्याने डॉक्टरांनी त्याला तपासून छत्रपती संभाजीनगर येथे रेफर केले आहे.
जालन्यात पुन्हा गोळीबार; दारू ढोसत गावठी कट्टा हातात घेऊन भर बाजारात गोंधळ; समजावणाऱ्या तरूणावर केला फायर #crime#jalanapic.twitter.com/5xgJ0oRK0f
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) December 21, 2023
ग्रामस्थांनी ठेवले बांधून
सदरील तरूण हा दारू पिऊन नागरिकांना गावठी पिस्टलचा धाक दाखवून गोंधळ घालता होता. त्याने अमोल शिंदे याच्यावर गोळीही झाडली. त्यानंतर ग्रामस्थांनी त्याचे हातपाय बांधून ठेवले. याची माहिती घनसावंगी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला जेरबंद केले आहे. त्याच्याकडून गावठी पिस्टल व जीवंत काडतूसे जप्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.