घनसावंगीत भडका; इतरत्र शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:51 AM2018-07-25T00:51:14+5:302018-07-25T00:51:33+5:30

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून जिल्ह्यातील घनसावंगी येथे मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास झालेल्या आंदोलनास हिंसक वळण लागले. यावेळी पोलीस ठाण्यासमोरील तीन दुचाकींसह अंबड येथून आलेला अग्निशमन दलाचा बंब पेटवून देण्यात आला. यावेळी हवेत गोळीबार करावा लागल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला होता. या दगडफेकीत पोलीस कर्मचारी जखमी झाले.

Firing in Ghansawangi, Silence elsewhere | घनसावंगीत भडका; इतरत्र शांतता

घनसावंगीत भडका; इतरत्र शांतता

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून जिल्ह्यातील घनसावंगी येथे मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास झालेल्या आंदोलनास हिंसक वळण लागले. यावेळी पोलीस ठाण्यासमोरील तीन दुचाकींसह अंबड येथून आलेला अग्निशमन दलाचा बंब पेटवून देण्यात आला. यावेळी हवेत गोळीबार करावा लागल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला होता. या दगडफेकीत पोलीस कर्मचारी जखमी झाले. दरम्यान जालना, भोकरदन, अंबड, मंठा, बदनापूर आणि जाफराबाद, परतूर येथे कडकडीत बंद पाळून काही ठिकाणी मोर्चा काढून अघिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या बंदमुळे एसटी वाहतूकीवरही परिणाम झाला असून, अनेक ठिकाणचे व्यवहार ठप्प झाले होते.
जालन्यातील तिरडी आंदोलनात आरक्षण देण्यास विलंब लागत असल्याने सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. अंबड चौफुली येथे या प्रतिकात्मक अंत्ययात्रेला अग्निडाग देण्यात आला. समाजातील महिलांनी आरक्षणाच्या मुद्यावरून विचार व्यक्त करत मराठा समाजाची होत असलेली कुंचबना थांबविण्याची कळकळीची विनंती केली. त्यासाठी समाजाने शांततापूर्ण संघर्षाची तयारी ठेवण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. यावेळी सराफा बाजार व अन्य व्यापारी प्रतिष्ठाने मंगळवारी पूर्णत: बंद होती.
घनसावंगीत दगडफेक व जाळपोळ
घनसावंगी : आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या बंदला घनसावंगीसह तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळाला. मंगळवारी सकाळी येथे सभा सुरू असताना अचानक दगडफेक आणि आराडा-ओरड झाल्याने मोठा गोंधळ उडाला. यावेळी पोलीस ठाणे तसेच तहसीलसह अन्य कार्यालयावर प्रचंड दगडफेक केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी प्रारंभी जमावावर नियंत्रण मिळविण्यासाठी अश्रूधुराचे नळकांडे फोडले. मात्र, जमाव शांत नसल्याचे दिसताच पोलिसांनी हवेत गोळीबार केला. यावेळी जवळपास अर्धा तास एकच गोंधळ उडाला होता. जमावाकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात येत असल्याने पोलिसांनी माघार घेत पोलीस ठाणे गाठले. याची माहिती पोलीसांनी तातडीने पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांना दिल्यावर त्यांनी राज्य राखीव दलाची एक तुकडी, दंगा नियंत्रण पथकाला रवाना केले. पोलिसांची जादा कुमक आल्यावर वातावरण शांत झाले. याचे पडसाद दिवसभर दिसून आले. पोलीसांनी सायंकाळी ६ जणांना अटक केली. सकाळी २० अश्रूधूराच्या नळकांड्या, पाच हँडग्रेनेड तसेच हवेत गोळीबारही करण्यात आला. दरम्यान या दंगलीमागे नेमके कोण आहेत, याचा शोध गुप्तचरांनी घेतला असून, त्यांची नावे लवकरच पुढे येतील असे सांगण्यात आले.
जालना : तिरडी मोर्चाला समाज बांधवांचा मोठा प्रतिसाद
मराठा आरक्षणाच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून तिरडी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या प्रमाणावर समाजबांधव सहभागी झाले होते. मोर्चाचे रूपांतर अंबड चौफुली येथे सभेत झाले. यावेळी मूक मोर्चाप्रमाणेच समाजातील महिलांनी प्रथम आपल्या मागण्या भाषानातून धारदारपणे मांडल्या. या मागण्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हाधिका-यांनी यावे असा आग्रह मोर्चातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घेतल्याने काहीकाळ किरकोळ वाद झाला. निवेदन स्विकारण्यासाठी जालन्याचे उपविभागीय अधिकारी केशव नेटके, तहसीलदार बिपीन पाटील हे उपस्थित होते.
पोलीस अधीक्षकांची भेट
घनसावंगी येथे झालेल्या दंगलीनंतर सायंकाळी पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या सोबत अंबडचे पोलीस उपविभागीय अधिकारी सी.डी. शेवगण, पोलीस निरीक्षक बंटेवाड व अन्य पोलीस कर्मचा-यांची उपस्थिती होती.

Web Title: Firing in Ghansawangi, Silence elsewhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.