बसमधील प्रथमोपचार साहित्य गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 01:11 AM2017-12-24T01:11:58+5:302017-12-24T01:12:01+5:30
महामंडळाच्या वतीने प्रत्येक बसमध्ये प्रथमोपचार पेट्या बसविण्यात आल्या होत्या. मात्र ५० बसमधील पेट्यांतील साहित्य गायब झाल्याचे उघडकीस आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : राज्य परिवहन महामंडळातर्फे प्रवाशांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. चालक, वाहकाबरोबर प्रवाशांची काळजी म्हणून प्रथोमपचार करण्यासाठी महामंडळाच्या वतीने प्रत्येक बसमध्ये प्रथमोपचार पेट्या बसविण्यात आल्या होत्या. मात्र ५० बसमधील पेट्यांतील साहित्य गायब झाल्याचे उघडकीस आले आहे.
जालना, परतूर, जाफराबाद आणि अंबड असे चार आगार मिळून जिल्ह्यात २१० बस सेवेत आहेत. मुुंबई येथील भांडार आणि खरेदी विभागाकडून बसमध्ये प्रथमोउपचार पेट्या साहित्यासह पुरविल्या जातात. मात्र चालक-वाहक यांच्या हलगर्जीपणामुळे बसमधील पेट्यातील साहित्य गायब झाले आहे. अपघात घडल्यास, जखम किंवा गंभीर दुखापत झाली असल्यास उपचारासाठी बसमध्ये प्रथोमपचार पेटी बसवलेली असते. या पेटीत बॅण्डेज, मलम, आयोडीन, चिकटपट्या, गोळ्या आदी साहित्य ठेवण्यात येते. याची सर्वशी निगराणी करण्याच्या सूचना चालक-वाहकांना असतात. बहुतांश बसमध्ये प्रथमोपचार पेट्यातील साहित्य चोरीस गेल्याचे निर्दशनास आले. विशेष म्हणणे शहरातील आगारातून पुणे, मुंबई, नागपूर आदी लांब पल्ल्याच्या बस जातात या गाड्यांना अपघात होण्याची भीती असते. मात्र प्रवाशांवर प्रथमोपचार करण्यासाठी जर साहित्यच नसेल, तर प्रवाशाच्या जीवही जाऊ शकतो. याकडे विभागीय नियंत्रकांनी गांभिर्याने लक्ष देण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.