पहिल्या दिवशी अधिकाऱ्यांची दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 12:47 AM2018-12-04T00:47:57+5:302018-12-04T00:49:10+5:30
जिल्हा परिषदेत अधिकारी वर्गा$चा मनमानी कारभार सुरू आहे. कोणालाही न सांगता अधिकारी गैरहजर राहत असल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्हा परिषदेत अधिकारी वर्गाचा मनमानी कारभार सुरू आहे. कोणालाही न सांगता अधिकारी गैरहजर राहत असल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहेत. सोमवारी लोकमतच्या टीमने जिल्हा परिषदेतील सर्वच विभागाची पाहणी केली. या पाहणीत महिला व बाल कल्याण विभागाचे उप मुख्य अधिकारी सोडले तर सर्वच जण अनुपस्थित दिसले. या प्रकरामुळे सोमवारी ग्रामीण भागातून आलेल्या सर्वच नागरिकांची कामे खोळंबली होती.
जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय समजले जाते. येथूनच सर्व जिल्ह्याचा कारभार चालतो. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात कामांसाठी दररोज जिल्हा परिषदेच्या कार्यालयात येतात. नागरिकांच्या कामांसाठी अधिकाºयांना सोमवार व शुक्रवार हा दिवस दिला आहे. परंतु, संबंधित विभागाचे अधिकारीच नसल्याने नागरिकांना निराश होऊन परत जावे लागते. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लोकमतने जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांची पाहणी केली. सुरवातीलाच मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांचे दालन बंद दिसले. त्यानंतर सर्व विभागांची पाहणी केली. त्यानंतर स्वच्छ भारत मिशनचे उप मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या कार्यालयाची पाहणी केली. त्यांचेही कार्यालय बंदच दिसले. येथील कर्मचा-यांकडे विचारपूस केली असता, ते म्हणाले की, साहेब आलेच नाही. तसेच पशु संवर्धन विभाग, बांधकाम विभाग, कृषी विभाग, आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग, शिक्षण विभाग, प्राथमिक व माध्यमिकचे अधिकारीच दिसले नाही.
या प्रत्येक विभागाच्या बाहेर मात्र, ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी खरात हे मात्र कार्यालयात अधिका-यांची बैठक घेत होते.
वेगवेगळी कारणे सांगून अधिकारी दिवस-दिवस गायब असतात. नागरिक मात्र जिल्हा परिषदेत हेलपाटे मारत असून अधिकारी गैरहजर असल्याने त्यांची कामे होत नाहीत.
कारभार सुधारण्याची गरज
जिल्हा परिषदेच्या समित्यांच्या सभा, सर्वसाधारण सभांना अन्य सरकारी विभागाच्या अधिका-यांना बोलावले जाते. परंतु, या विभागांचे अधिकारी मात्र सभांना जाण्याचे टाळतात. काही वेळेस प्रतिनिधी पाठवतात. त्यामुळे सभेत कामकाज करणे अवघड होते. अशा वेळी सदस्य संतापतात. गैरहजर राहणा-या अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी केली जाते. त्यानुसार अधिका-यांच्या तक्रारीही झाल्या आहेत. आता मात्र जिल्हा परिषदेतील अनागोंदी कारभार समोर आला आहे. जिल्हा परिषद प्रशासनाचा कारभार सुधारण्याची गरज ग्रामीण भागातून आलेल्या ग्रामस्थांनी बोलून दाखवली.
सोमवारी काही अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. यानंतर सोमवारी आणि शुक्रवारी अधिकारी कार्यालयात हजर नसले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
- अनिरुध्द खोतकर, जि.प. अध्यक्ष