आधी ३० दिवस दिले, आणखी दहा घ्या पण टिकणारे मराठा आरक्षण द्या: मनोज जरांगे

By विजय मुंडे  | Published: September 14, 2023 12:27 PM2023-09-14T12:27:19+5:302023-09-14T12:28:59+5:30

शासनाच्या मागणीनुसार एक महिना दहा दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. परंतु, अंतरवाली सराटी येथील साखळी उपोषण सुरू राहणार आहे.

First given 30 days, take 10 more but give lasting Maratha reservation: Manoj Jarange | आधी ३० दिवस दिले, आणखी दहा घ्या पण टिकणारे मराठा आरक्षण द्या: मनोज जरांगे

आधी ३० दिवस दिले, आणखी दहा घ्या पण टिकणारे मराठा आरक्षण द्या: मनोज जरांगे

googlenewsNext

जालना/ वडीगोद्री : मुख्यमंत्री शिंदे धाडसी निर्णय घेणारे आहेत. ते आपल्याला न्याय देतील हा आपल्याला विश्वास आहे. मराठा समाजाला विश्वासात घेवून मी त्यांना वेळ दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी मागे हटणार नाही. त्यांनाही मागे हटू देणार नाही. साहेब, समाजाच्या वतीने आणखी दहा दिवस वाढवून घ्या. पण आम्हाला कायम टिकारे आरक्षण द्या. जीव गेला तरी आरक्षण मिळाल्याशिवाय थांबणार नाही. मी भारावून गेलो नाही महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण द्यावेच लागेल. मराठा समाजाच्या वतीने विनंती करतो. टिकणारे आरक्षण द्या. 

१७ व्या दिवशी उपोषण मागे
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनाेज जरांगे यांनी २९ ऑगस्ट रोजी शहागड येथे आंदोलन करून त्याच दिवसापासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणकर्त्यांवर १ सप्टेंबर रोजी लाठीचार्ज झाला आणि त्याचे पडसाद राज्यात उमटले. उपोषणकर्त्यांच्या मागणीनुसार शासनाने जीआर काढून त्यात वेळोवेळी बदल केला. परंतु, त्यात उपोषणकर्त्यांनी मागणीनुसार बदल होत नसल्याचे सांगत ते बदल अमान्य केले. त्यानंतर शासनाच्या शिष्टमंडळाने जरांगे यांच्याशी वेळोवेळी चर्चा केली. सर्वपक्षीयांची बैठकही झाली. त्यानंतर जरांगे यांनी एक महिन्याची वेळ देण्यास सहमती दर्शवित पाच अटी ठेवल्या होत्या. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी सकाळी अंतरवाली सराटी येथे धाव घेवून जरांगे यांच्याशी चर्चा केली आणि जरांगे यांनी उपोषणाच्या १७ व्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिवून उपोषण मागे घेतले. 

साखळी उपोषण सुरू राहणार
शासनाच्या मागणीनुसार एक महिना दहा दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. परंतु, अंतरवाली सराटी येथील साखळी उपोषण सुरू राहणार आहे. सरकारच्या समितीत आम्ही राहणार नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत ठिकठिकाणी शांततेत सखळी उपोषण करावे. कोणीही कायदा हातात घेवू नये, आरक्षणाला गालबोट लागू देवू नये, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.

मनोज जरांगे कौन है..
बाबा, तुझं पोरगं भारी आहे. स्वत:साठी नाही समाजासाठी लढतोय. ते जेव्हा मला भेटला तेव्हा वैयक्तिक फायद्यासाठी नाही तर समाजाच्या प्रश्नासाठी भेटला. मी परवा दिल्लीला गेलो होतो. तेथे मला विचारलं मनोज जरांगे कौन है.. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात उपस्थितांमध्ये हशा पिकला. मनोज जरांगे यांचा मराठा आरक्षणासाठी सुरू असलेला लढा प्रामाणिक असून, त्यामुळेच त्याला राज्यातून प्रतिसाद मिळत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी शासनही कटीबद्ध असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Web Title: First given 30 days, take 10 more but give lasting Maratha reservation: Manoj Jarange

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.