पहिल्याच पावसात रस्त्यांची लागली वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:07 AM2019-06-26T00:07:33+5:302019-06-26T00:07:44+5:30
कुंभार पिंपळगावसह परिसरात पावसाचे आगमन झाले आणि गोदाकाठच्या रस्त्यांची पूर्णत: वाट लागली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुंभार पिंपळगाव : कुंभार पिंपळगावसह परिसरात पावसाचे आगमन झाले आणि गोदाकाठच्या रस्त्यांची पूर्णत: वाट लागली. सर्वच रस्ते चिखलमय झाले असून, रस्त्यावरून वाट शोधताना कसरत करावी लागत आहे.
घनसावंगी तालुक्यातील गोदाकाठच्या परिसरातील रस्ते हे रस्ते कच्चे रस्ते तयार झाले आहेत. गोदावरी नदीमुळे परिसरात उसाची लागवड अधिक असते. रस्ता खराब असल्याने ऊस वाहतुकीसाठी रस्त्यावर माती, मुरुम टाकून दुरुस्त करण्यात आली होती.
मान्सूनच्या पावसाने शनिवारी पहाटेपासून कुंभार पिंपळगाव भागात दमदार हजेरी लावली. पावसामुळे गोदाकाठच्या रस्त्यावर सर्वत्र पाणी साचले असून, पाण्यामुळे चालकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही. तसेच चिखलामुळे वाहने रस्ता सोडून खाली जाऊ लागले असून, अपघाताची शक्यता वाढली आहे. त्यामुळे या भागातील रस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तयार करावेत, अशी मागणी होत आहे.
कुंभार पिंपळगाव वरुन जाताना शिवणगाव रस्त्यावर गावानजीक एक डाव्या कालव्याच्या चारीचा पूल लागतो. तो पूल मागील सहा महिन्यापूर्वी जायकवाडी विभागाकडून पाण्याचा विसर्ग कमी होत असल्याने तोडण्यात आला. त्यानंतर तो पूल माती टाकून बुजविण्यात आला. मात्र; पावसामुळे रस्त्याची वाट लागली असून, या पुलावरून वाहने तर सोडा; बैलगाडी देखील जाऊ शकत नसल्याची स्थिती आहे. शनिवारी सकाळी एका चालकाने या पुलावरून वाहन घातले. मात्र, चिखलात ते वाहन फसले.
दुपारी तीनपर्यंत प्रयत्न करूनही वाहन निघत नसल्याने अखेर जेसीबीच्या सहाय्याने वाहनाला चिखलातून काढावे लागले.
याठिकाणी माती टाकून पूल बुजवल्याने चारीतून येणारे पाणी पुलाजवळ थांबणार आहे. त्यामुळे जवळच असलेल्या शहीद भगतसिंग शाळेत पाण्याचे तळे होण्याची शक्यता आहे. शाळा, ग्रामस्थांच्या वतीने जायकवाडी प्रशासनाकडे याबाबत तक्रारी करूनही दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. पुलाचे काम त्वरित न झाल्यास शिवणगावचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे.
कुं.पिंपळगाव : दोन जिल्ह्यांना जोडणारा रस्ता
कुंभार पिंपळगाव ते शिवणगाव रस्ता झाला तर बीड व जालना जिल्ह्याच्या मध्ये असलेल्या शिवणगाव येथील गोदावरी नदीवरील बंधाऱ्यावरुन वाहनांना ये-जा करण्यासाठी सोयीचे होणार आहे.
शिवाय दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा रस्ता सुरळीत होऊन सर्वांचीच सोय होणार आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करावी, अशी मागणी होत आहे.