खते, बियाणे खरेदीची शेतकऱ्यांना चिंता...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 12:43 AM2019-05-15T00:43:18+5:302019-05-15T00:44:13+5:30
जालना तालुक्यातील शेतकऱ्यांना भयावह दुष्काळात शासनाकडून आर्थिक अद्यापही मदत मिळाली नाही. शिवाय पीकविमाही न मिळाल्याने खते, बियाणांची खरेदी कशी करायची? असा प्रश्न शेतक-यांना पडला आहे.
विष्णू वाकडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
रामनगर : जालना तालुक्यातील शेतकऱ्यांना भयावह दुष्काळात शासनाकडून आर्थिक अद्यापही मदत मिळाली नाही. शिवाय पीकविमाही न मिळाल्याने खते, बियाणांची खरेदी कशी करायची? असा प्रश्न शेतक-यांना पडला आहे.
गतवर्षी २०१७-१८ मध्ये भरलेला रबीचा व चालु वर्षातील खरीप आणि रब्बी हंगामाचा पिकविमा शेतक-यांना अद्यापही मिळाला नाही. परिणामी, शेतक-यांचा जीव टांगणीला लागला आहे. तसेच खरीप २०१८ साठी शासनाने जाहीर केलेली अर्थिक मदत एकाच टप्प्यात देण्याऐवजी ती दोन टप्प्यात विभागून देण्यात येत आहे. बहुतांश गावातील शेतक-यांना अर्धा मे महिना उलटला, तरीही अर्थिक मदत मिळाली नाही. पहिलाच टप्पा न मिळाल्याने दुसरा टप्पा कधी मिळणार ? अशा सवालही शेतकरी करत आहे.
गेल्या पाच ते सहा वर्षांपासून सततची दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. तालुक्यात सिंचन क्षेत्र कमी असल्याने बहुतांश वर्ग कोरडवाहु शेतीवरच अवलंबून आहे. परिणामी, तालुक्यातील फळबाग क्षेत्र कमालीचे घटले आहे. यावर्षीही दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी अर्थिक संकटात सापडला आहे. अशातच शासनाने जाहीर केलेली मदत अद्यापही शेतक-यांना मिळाली नाही.
खरीप व रब्बीची पिके वाया गेल्याने शेतकरी मोठ्या अर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच पिकांचे झालेले नुकसान विम्या पोटी भरुन मिळेल या आशेने शेतक-यांनी पिक विमा भरला. पिक विमा दुष्काळात शेतक-यांना सावरेल अशी अपेक्षा शेतक-यांना होती. परंतु, ही अपेक्षाही भंग झाली आहे. अशा परिस्थितीत येणा-या हंगामात खते व बियाणांची खरेदी कशी करायची ? असा प्रश्न शेतक-यांसमोर आहे.
शेतक-यांना शंका : बोगस बियाणांचे काय ?
बोगस बियाणे आणि खतांचा उलगडा महसूल तसेच कृषी विभागाने केला. याचा मनस्वी आनंद शेतक-यांना झाला. असे असले तरी पुढच्या हंगामास सामोरे जातांना बियाणे आणि खते ही चांगली मिळतील का ? अशी शंका त्यांच्या मनात घर करुन आहेत. यासाठी बियाणे व खतांबद्दल कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज आहे.