तुरुंग अधिका-यांसाठी फिटनेस महत्त्वाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:36 AM2018-01-10T00:36:17+5:302018-01-10T00:36:21+5:30
कारागृह सुरक्षेची महत्त्वाची जबाबदारी असणा-या तुरुंग अधिकारी व कर्मचा-यांसाठी फिटनेस महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन औरंगाबाद विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांनी केले.
जालना : कारागृह सुरक्षेची महत्त्वाची जबाबदारी असणा-या तुरुंग अधिकारी व कर्मचा-यांसाठी फिटनेस महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन औरंगाबाद विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांनी केले.
येथील जिल्हा कारागृहात उभारण्यात येणा-या अद्ययावत व्यायामशाळेच्या कामाचे भूमिपूजन मंगळवारी धामणे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
कारागृह अधीक्षक धनसिंग कवाळे, तरुंग अधिकारी एस.बी. निर्मळ, अनंत टेंगरे, तांबोळी यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
उपमहानिरीक्षक धामणे म्हणाले, की कारागृह परिसरात राहणा-या अधिकारी व कर्मचा-यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. कारागृहातील अधिकारी, कर्मचारी व पाल्यांसाठी अद्ययावत व्यायाम शाळा उभारण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा क्रीडा विभागाकडून इमारत बांधकामासाठी सात लाख रुपये आणि व्यायाम शाळेतील साहित्य खरेदीसाठी सात लाख, असे १४ लाख रुपये मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा कारागृहाकडे येण्यासाठी मुख्य रस्त्याची अडचण आहे. हे लक्षात घेता जिल्हाधिका-यांनी रस्ताकामासाठी जागा मंजूर केली आहे. लवकरच कारागृहासाठी डांबरी रस्ता तयार करण्यात येईल.