नोकरानेच दिली लुटीची टीप, पाच आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 01:15 AM2019-03-01T01:15:24+5:302019-03-01T01:15:37+5:30
कटलरी दुकानातील नोकरानेचे त्यांच्या साथीदाराच्या मदतीने सेल्समनला लुटले. चंदनझिरा पोलिसांनी पाचही आरोपींना गुरुवारी अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : लघुशंका करण्यासाठी थांबलेल्या सेल्समनला मारहाण करून डोळ्यात मिरची पावडर टाकून १ लाख ७० हजार रुपये रक्कम असलेली बॅग हिसकावून नेल्याची घटना बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास जालना-औरंगाबाद मार्गावर असलेल्या एकता हॉटेल परिसरात घडली होती. जालना येथील एका कटलरी दुकानातील नोकरानेचे त्यांच्या साथीदाराच्या मदतीने सेल्समनला लुटले. चंदनझिरा पोलिसांनी पाचही आरोपींना गुरुवारी अटक केली.
गुजरात येथील सेल्समन जतीन मन्सूखभाई ठक्कर हे जालना येथील जिंदल मार्केटमधील दुकानात वसुलीसाठी आले होते. त्याच दुकानामध्ये नोकर म्हणून काम करणारा बाळू अप्पा लंगोटे याला घेऊन मोटरसायकल क्रमांक एम.एच २१ बी.के. ५११ ने औरंगाबादकडे जात असतांना दुचाकीवरुन आलेल्या दोन अनोळखी व्यक्तीने पाठीमागून येऊन लाकडी काठीने मारहाण करुन रोख १ लाख ७० हजार रुपये असलेली बॅग हिसकावून नेली. जतीन ठक्कर यांच्या फिर्यादीवरुन चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चंदनझिरा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून बाळू लंगोटे, (२४ रा. लोधीमोहल्ला), सुशांत राजू भुरे (२० रामनगर कानडी मोहल्ला), रवी आनंद कुस्लमवार (२५), सरस्वती मंदिर, लक्ष्मण किसन गोरे (२२), अमोल एकनाथ काचेवाड (२२), या पाच आरोपींना अटक केली. आरोपी बाळू लंगोटे यानेच आपल्या मित्राला बोलावून लुटीची टीप दिल्याचे पोलीस तपासात समोर आले.