मुक्तेश्वर तलावाच्या सुशोभिकरणासाठी पाच कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 01:23 AM2019-10-31T01:23:08+5:302019-10-31T01:23:57+5:30
जुना जालना भागातील मुक्तेश्वर तलावाचे खोलीकरण करून त्या परिसरात वॉकिंग ट्रॅकसह, वाचनालय, अत्याधुनिक जिमची व्यवस्था करण्यात येणार आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जुना जालना भागातील मुक्तेश्वर तलावाचे खोलीकरण करून त्या परिसरात वॉकिंग ट्रॅकसह, वाचनालय, अत्याधुनिक जिमची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी पाच कोटी रूपयांचा निधी मंजूर केला असून, भविष्यात आणखी निधीची गरज पडल्यास तोही देऊ असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.
पाडव्याच्या मुहूर्तावर दानवेंच्या हस्ते या तलावातील पाण्याचे जलपूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी सांगितले की, मुक्तेश्वर तलाव हा प्रचीन जलस्त्रोत आहे. याचे जतन करण्यासाठी नगरसेवक अशोक पांरगारकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी जो पुढकार घेतला तो प्रेरणादायी आहे. यासाठी आमच्याकडून आम्ही आज पाच कोटी रूपयांचा निधी देऊ केला आहे. त्यातून या तलावाचे खोलीकरण चांगल्या पध्दतीने केल्याने आज येथे मोठे पाणी साठले आहे. या परिसराला याचा मोठा लाभ होणार असून, भूगर्भातील पाणीपातळीतही वाढ होणार असल्याचे दानवे म्हणाले.
प्रास्ताविक करतांना नगरसेवक अशोक पांगारकर यांनी सांगितले की, मुक्तेश्वर महादेव मंदिर परिसराचा खरा विकास केला तो, मंदिराचे विश्वस्त रामराव देशमुख यांनी त्यांना आम्ही या परिसराचा विकास करण्यासाठी हातभार लावतो असे सांगितल्यावर त्यांनी होकार दिला.
या तलावातील गाठ काढण्यासाठी समस्त महजन ट्रस्टसह जिल्हाधिकारी तसेच नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, आ. कैलास गोरंट्याल यांची मदत झाली. नगरसेवकांनी यासाठी पालिकेने पोकलेनसाठीचा डिझेलचा खर्च द्यावा अशी मागणी केली होती. ही मागणी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी मंजूर केल्याचेही पांगारकर म्हणाले.
यावेळी उपनगराध्यक्ष राजेश राऊत, बाजार समितीचे उपसभापती भास्कर दानवे, भाजपचे शहराध्यक्ष सिध्दिविनायक मुळे, भाजपचे सरचिटणीस देविदास देशमुख, शशिकांत जाधव, धीरज मेवाडे, संजय इंगळे, राजेंद्र काला, विजय पांगारकर, सुनील पांगारकर, विनोद सिनगारे, पिंकेश टापर, शशिकांत घुगे आदींची उपस्थिती होती. यावेळी विनायक महाराज फुलंब्रीकर, विजय पाठक यांनी विधिवत पूजा सांगितली.
मुक्तेश्वर तलावाचे सुशोभीकरण करतांना वृक्ष लागवड करून पर्यावरण संरक्षणाला महत्व देण्यात येणार आहे.
यासाठी वृक्ष लागवडीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामांसाठी खा. दानवे यांनी जो पाठिंबा दिला त्यामुळेच हे शक्य झालल्याचे पांगारकर म्हणाले.