दोन घटनांमध्ये पाच मुलींचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 09:24 PM2017-09-24T21:24:30+5:302017-09-24T21:24:38+5:30
दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये जालना जिल्ह्यात पाच मुलींचा बुडून मृत्यू झाला. यात दोन-दोन अशा चार सख्ख्या बहिणींचा समावेश आहे. पहिली घटना तालुक्यातील कस्तुरवाडी येथे तर दुसरी घटना परतूर तालुक्यातील वाई येथे घडली.
बदनापूर (जि. जालना) : दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये जिल्ह्यात पाच मुलींचा बुडून मृत्यू झाला. यात दोन-दोन अशा चार सख्ख्या बहिणींचा समावेश आहे. पहिली घटना तालुक्यातील कस्तुरवाडी येथे तर दुसरी घटना परतूर तालुक्यातील वाई येथे घडली.
कस्तुरवाडी येथे गावाजवळील लाहुकी नदीत काही महिला कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धूवत असताना सायमा जुम्मेखॉ पठाण (१४) गजाला शेख मोईन (१९) व राणी उर्फ सुरया शेख मोईन (१३) तिघी पाण्यात पडल्या. त्यांनी एकमेकींना वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र पोहता येत नसल्याने बुडून त्यांचा मृत्यू झाला. गजाला व सुरया या सख्ख्या बहिणी, तर सायमा त्यांची मामेबहीण होती. त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात सिमा शे शब्बीर (१३) हिचाही पाण्यात तोल गेला, मात्र बाहेर पडल्यामुळे ती सुदैवाने वाचली.
रुग्णवाहिका वेळेवर मिळाली असती तर...
सायमा पठाण या मुलीस पाण्याबाहेर काढले तेव्हा तिचा श्वास सुरू होता, जर आम्हाला वेळेवर रुग्णवाहिका मिळाली असती ती वाचली असती. अनेक वेळा दवाखान्यात फोन लावला परंतु आम्हाला गाडी येत आहे, असे सांगण्यात आले. शेवटी तिघींचे मृतदेह बैलगाडीत घेऊन मुख्य रस्त्यावर आलो, अशी माहिती गावातील रऊफ बेग यांनी दिली.
वाईत दोन बहिणींचा बुडून मृत्यू
वडिलांनी झाडावरून हाकललेली वानरे स्वत:च्या दिशेने आल्याने घाबरून साक्षी गायकवाड (९) व मिनाक्षी गायकवाड (६) या दोन बहिणी विहीरीत पडल्या. यात त्यांचा मृत्यू झाला. मंठा तालुक्यातील वाई येथे रविवारी सकाळी अकरा वाजता ही घटना घडली.