पाचशे जणांनी केले शस्त्र जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 12:33 AM2019-03-26T00:33:04+5:302019-03-26T00:34:09+5:30
जिल्ह्यात ६८९ परवानाधारक शस्त्रधारक आहेत. त्यापैकी ५१० जणांनीच आतापर्यंत शस्त्रे जमा केली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागल्यानंतर जिल्ह्यातील परवाना धारकांकडून शस्त्र जमा करण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून करण्यात येत आहे. यासाठी संबंधितांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात ६८९ परवानाधारक शस्त्रधारक आहेत. त्यापैकी ५१० जणांनीच आतापर्यंत शस्त्रे जमा केली आहेत.
आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून जिल्ह्यातील परवानाधारकांची माहिती घेऊन शस्त्र जमा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
जिल्हा निवडणूक विभागाकडून वेगवेगळ्या स्तरावर बैठका घेतल्या जात आहेत. आचारसंहिता लागू होताच प्रशासनाने ६८९ जणांना शस्त्र जमा करण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत.
२३ मार्चपर्यंत ५१० जणांनी आपली शस्त्रे जमा केल्याची माहिती प्रशासनाने दिली. जिल्ह्यातील त्या - त्या पोलीस ठाणे हद्दीतील परवाना धारकाकडून शस्त्र जमा करण्यासंदर्भात नोटिसा बजावून आढावा घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील बदनापूर, भोकरदन, सेवली, हसनाबाद इ. ठिकाणच्या ११ बँकांना शस्त्र जमा करण्याच्या कारवाईतून सूट देण्यात आली आहे. बँकांना स्वसंरक्षणासाठी शस्त्र वापरासंदर्भात परवाना देण्यात आला आहे.
पोलीस दप्तरी नोंद नसलेल्या बेकायदेशीर शस्त्रांवर पोलिसांची निवडणूक काळात नजर असणार आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन महिन्यांपूर्वी केलेल्या कारवाईत दोघा जणांकडून गावठी कट्टा जप्त केला होता. यामुळे अवैध शस्त्राची खरेदी विक्री करणारे रॅकेट जिल्ह्यात सक्रिय आहे. तसेच जालना शहराला रेल्वेची सुविधा असल्याने शस्त्राची ने आण करणे सोपे झाले आहे. यामुळे पोलिसांना बेकायदेशीर शस्त्रावर नजर ठेवावी लागणार आहे.