सायबर सेलकडून पाच गुन्हे उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:08 AM2018-07-22T00:08:24+5:302018-07-22T00:08:59+5:30
सायबर गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी मराठवाड्यात प्रथमच जालना येथे पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी सायबर सेलची स्थापना केली. या अंतर्गत सहा गुन्ह्यांपैकी पाच गुन्हे उघडकीस आणले असल्याची माहिती पोकळे यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यातील सायबर गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी मराठवाड्यात प्रथमच जालना येथे पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी सायबर सेलची स्थापना केली. या अंतर्गत सहा गुन्ह्यांपैकी पाच गुन्हे उघडकीस आणले असल्याची माहिती पोकळे यांनी दिली.
सध्याचे युग डिजिटलायझेशनचे असल्याने अनेक युवक या सुविधेचा गैरफायदा घेऊन नागरिकांना फसवत असल्याच्या तक्रारी या सेलकडे दाखल झाल्या आहेत. या सेलचे प्रमुख तथा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर हे सायबर तज्ज्ञ असल्याने त्यांनी या सहा गुन्ह्यांपैकी पाच गुन्ह्यांचा तपास यशस्वी करून संबंधित तक्रारदारांना न्याय मिळवून दिला आहे.
यामध्ये राजेश पारगावकर (१० हजार), शर्मिला पद्माकर गोरे (२८ हजार १४५), प्रियंका अंकुश वहाणे (२५ हजार), गीता बाळासाहेब भोंडे (२० हजार) यांची क्रेडिट कार्ड तसेच डिजीटल व्हॉलेटच्या माध्यमातून फसवणूक झाली होती. कंसातील आकडे हे त्यांच्या फसवणूक झालेल्या रकमेचे आहेत जे की, सायबर सेलने तपास करून त्यांना परत मिळवून दिले आहे.
व्हॉट्स अॅप, फेसबुक, के्रडिट कार्ड, आॅनलाईन खरेदी-विक्री या माध्यमातूनही अनेकांची फसवणूक झाली होती. परंतु, गौर यांनी यात शिताफीने आणि तंत्रशुद्ध तपास करून गुन्ह्यावर नियंत्रण मिळविण्यासह सोशल मीडियातून होणाऱ्या बदनामीलाही आळा घालण्यात यश आल्याचे पोकळे यांनी सांगितले. या तपासकामी अपर पोलीस अधीक्षक लता फड यांचेही मार्गदर्शन लाभल्याचे गौर यांनी सांगितले. गौर यांनी खाते अंतर्गत सायबर लॉची पदवी घेतल्याने त्यांच्याकडे हा पदभार देण्यात आल्याचे पोकळे म्हणाले.