गर्भवती जावांच्या मृत्यूप्रकरणी पाच जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 12:20 AM2017-11-29T00:20:14+5:302017-11-29T00:20:16+5:30
तालुक्यातील मच्छिंद्र चिंचोली वाडी येथील गर्भवती सख्ख्या जावांचा सोमवारी सकाळी १० वाजता शेतात कापूस वेचायला गेल्यानंतर विहिरीत पडून मृत्यू झाला. सोमवारी मध्यरात्रीनंतर १ वाजता गुन्हा दाखल झाला.
घनसावंगी : तालुक्यातील मच्छिंद्र चिंचोली वाडी येथील गर्भवती सख्ख्या जावांचा सोमवारी सकाळी १० वाजता शेतात कापूस वेचायला गेल्यानंतर विहिरीत पडून मृत्यू झाला. घटनेनंतर माहेरच्या मंडळींनी घनसावंगी ठाण्यात ठिय्या मांडला. उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सोनवणे यांनी भेट दिल्यानंतर अखेर सोमवारी मध्यरात्रीनंतर १ वाजता गुन्हा दाखल झाला.
दोघींचेही मार्च व एप्रिलमध्ये लग्न झाले होते. दोघीही गर्भवती असल्याने माहेरकडील महिला मंडळींनी आक्रोश केला. यावेळी सर्व परिसरात स्मशान शांतता होती. काही नातेवाईकांनी मुलीच्या सास-यांना चोप दिला.
गेल्या मार्चमध्ये दोघींच्या मात्या-पित्यांनी हुंडा देऊन विवाह करून दिले होते. हुंड्याची काही रक्कम बाकी होती. त्यासाठी सासरा व पती मारहाण करीत असल्याचे त्या माहेरी सांगत.
घटनेच्या दिवशी त्यांनी माहेरी फोन करून मारहाण होत असल्याचे सांगितले. त्यामुळे मुक्ताचा भाऊ ज्ञानदेव चिंचोलीवाडी येथे आला असता त्यांना त्या घरी दिसल्या नाहीत. त्या शेतात गेल्याचे कळले. त्या ठिकाणी आलो असता त्या विहिरीच्या काठावर मृतावस्थेत दिसून आल्या. त्यांच्या तोंडातून रक्त निघत होते. ओठ फुटलेले होते. सर्व अंगावर मारहाण केल्याच्या खुणा होत्या. दोघींजवळ ‘आम्ही सासरच्या लोकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत आहोत’ असे लिहिलेल्या चिठ्ठ्या निघाल्या. म्हणून कायदेशीर कारवाई करावी, अशी तक्रार माहेरकडील मंडळींनी दिली.
या तक्रारीवरून सासरा रामचंद्र बुधनर, जयश्रीचा पती अंगद, मुक्ताचा पती पोपट, दीर मनोहर, विहीर मालक रामेश्वर शिंदे (पोपट व अंगदचा मावसभाऊ) या पाच जणांवर ३०४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व पाचही जणांना पोलिसांनी सकाळी अटक केली. दुपारी न्यायालयात हजर केले असता २ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जे.बी. पुरी हे करीत आहेत.