विद्युत तारा तुटून पाच दुकाने खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:10 AM2019-04-11T00:10:19+5:302019-04-11T00:10:33+5:30
वीज वितरण कंपनीची एल टी लाईनची तार तुटून बसस्थानकासमोरील पाच दुकानाला आग लागून ११ लाख रुपयांचे नुकसान झाले
लोकमत न्यूज नेटवर्क
तीर्थपुरी : येथील वीज वितरण कंपनीची एल टी लाईनची तार तुटून बसस्थानकासमोरील पाच दुकानाला आग लागून ११ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना बुधवारी सकाळी साडेआठ वाजता घडली आहे. मात्र, वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता म्हणाले की, घटना घडली तेव्हा वीज पुरवठा बंद होता. यामुळे शॉर्टसर्किट व्हायचा प्रश्नच येत नाही.
येथील कुंभार पिंपळगाव रस्त्यावरील बसस्थानकासमोर शेख इस्माईल पिंजारी यांचे गादी घर आहे. बुधवारी सकाळी एल टी वीजेची तार तुटून शॉर्टसर्किट झाल्याने त्यांच्या दुकानाला आग लागली. यात दुकानातील रूईच्या दोन मशीन, २० हजार रुपये किमतीचा कपडा २० हजार रूपयाचे पत्र्याचे शेड असा एकूण पाच लाख रूपयांचे नुकसान झाले. यानंतर या दुकानाच्या बाजूलाच असणाऱ्या शेख सत्तार यांचे राज मोटर रिवाइडिंग दुकान जळाले. त्यामध्ये मोटर पंप वेल्डिंग मशीन व इतर साहित्य असे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले.
संतोष पवार यांच्या किसान मोटार रिवायडींगलाही आग लागली. यात सहा मोटार पंप एसटीपी पंप, फॅन मीटर, ठिबक सिंचनाचे साहित्य असा दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. तसेच शेख बशीर यांचे लाकडी फर्निचर चे दुकानही जळाले त्यात दीड लाखाचे नुकसान झाले.
तीर्थपुरी येथील नवीन बस बसस्थानकासमोपरील या दुकानाला आग लागली त्यावेळी वीज वितरण कंपनीचा वीजपुरवठा बंद होता. गावातील काही विजेचे काम सुरू असल्यामुळे वीज बंद होती. यामुळे शॉर्टसर्किट झालेले नाही. उलट दुकानाला आग लागल्यामुळे आगीचा भडका झाल्याने विजेच्या तारा वितळून तुटल्या आहेत. तसेच ज्या दुकानाला आग लागली त्यांच्याकडे थकबाकी असल्यामुळे त्यांचा वीजपुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आला होता. अशी माहिती वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता व्यंकटेश परशे यांनी दिली आहे. तर प्रत्यक्षदर्शी म्हणतात विजेच्या शॉर्ट सर्किटनेच ही आग लागली आहे.