जाफराबादेत पाच दुकाने जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 01:06 AM2018-10-16T01:06:11+5:302018-10-16T01:06:54+5:30
शहरातील पंचायत समिती मुख्य रस्त्यावर असलेल्या भालके कॉप्लेक्समध्ये विजेच्या शॉटसर्किटमुळे लागलेल्या आगीत पाच दुकाने जळून खाक झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या आगीत जवळपास ६० लक्ष रुपयांचे विविध साहित्य जळून खाक झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जाफराबाद : शहरातील पंचायत समिती मुख्य रस्त्यावर असलेल्या भालके कॉप्लेक्समध्ये विजेच्या शॉटसर्किटमुळे लागलेल्या आगीत पाच दुकाने जळून खाक झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या आगीत जवळपास ६० लक्ष रुपयांचे विविध साहित्य जळून खाक झाले आहे.
शहरातील पंचायत समिती प्रवेश द्वाराजवळ बळीराम भालके यांच्या मालकीची दुमजली इमारत आहे. इमारतीच्या मागच्या बाजूने एका दुकानात शॉटसर्किट होवून आग लागल्याची घटना सकाळी घडली. आग लागताच खालच्या तळातील चार दुकाने जळून खाक झाली, तर वरच्या मजल्यावरील चार ते पाच दुकानातील सामान जळून खाक झाले. परीसारतील स्थानिक लोकांच्या मदतीमुळे सदरील आगीवर नियंत्रण मिळवण्यास मोठी मदत झाली. इमारतीत असलेल्या गणपती इलेक्ट्रॉनिक्स मधील विनोद जाधव,महादू जाधव यांच्या फर्निचर दुकानातील साहित्य, अमोल गाडेकर कृषी सेवा केंद्र, भालके हार्डवेअरच्या दुकान, किसान फाउंडेशनचे कार्यालय, सरोदे यांच्या दवाखाना, अमोल वाघ यांच्या मालकीचे जिजाऊ मोबाईल शॉपी आदी दुकानातील लाखो रुपयांचे साहित्य जळाल्याने मोठे नुकसान झाले.
नागरिकांनी तातडीने भोकरदन येथील अग्निशमन पाचारण करण्यात आले मात्र आगीचे रोद्र रुपाने दुकानांचे नुकसान झाले. अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन तासा नंतर आग विझली.
दानवे यांनी केली पाहणी
शहरात आग लागल्याचे कळताच आ. संतोष दानवे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पहाणी केली. तसेच झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याच्या सूचना तहसीलदार जे.डी. वळवी यांना दिल्या.