पाच हजार ‘आचार्य कुलम’ उभारणार-सुमनादीदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 12:30 AM2018-01-21T00:30:25+5:302018-01-21T00:30:31+5:30
भारताची भावी पिढी सक्षम बनविण्यासाठी पतंजली योगपिठाद्वारे देशात पाच हजार आचार्य कुलम उभारणार असल्याची माहिती पतंजली योगपीठाच्या केंद्रीय महिला प्रमुख डॉ. सुमनादीदी यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : भारताची भावी पिढी सक्षम बनविण्यासाठी पतंजली योगपिठाद्वारे देशात पाच हजार आचार्य कुलम उभारणार असल्याची माहिती पतंजली योगपीठाच्या केंद्रीय महिला प्रमुख डॉ. सुमनादीदी यांनी दिली.
योग गुरु रामेदवबाबा यांचे तीन दिवसीय मोफत चिकित्सा व योग शिबीर पुढील महिन्यात जालन्यात होत आहे. शिबिराच्या नियोजनाबाबत माहिती देण्यासाठी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. पतंजली योगपीठाच्या कार्याबद्दल डॉ. सुमनादीदी यांनी माहिती दिली. गत दहा वर्षात पतंजली योगपीठाने योग, आयुर्वेद आणि स्वदेशी या क्षेत्रात ऐतिहासिक योगदान दिले आहे. त्यामुळे योग देशातच नव्हे तर परदेशातही भारताची ओळख बनला आहे. आयुर्र्वेदिक क्षेत्रात पतंजली पीठाने सातत्याने केलेल्या कार्यामुळे नागरिक आता आयुर्वेदिक औषधांचा वापर करत आहे. पतंजलीच्या आयुर्वेदिक केंद्रामध्ये देशभरात वीस हजार आयुर्वेदिक डॉक्टर काम करत असून, ही संख्या अपुरी आहे. प्रत्येक क्षेत्रात नकारात्मक वातावरण वाढत आहे. मात्र, देशाला नकारात्मक नव्हे तर सकारात्मक विचाराने राष्ट्रनिर्मितीचे काम करणा-या माणसांची गरज आहे. त्यामुळे भावी पिढीला चांगले शिक्षण देण्यासाठी पंतजली योगपीठाने भारतीय शिक्षा मंडळाची स्थापना केली आहे. आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर या मंडळाच्या माध्यमातून पाच हजार आचार्य कुलम देशात सुरू केले जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. शहिद जवानांच्या पाल्यांसाठीही स्वतंत्र शाळा सुरू करण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या.
वाढत्या शारीरिक व मानसिक आजारांमुळे आज प्रत्येकला योग व आयुर्वेदाची गरज आहे. यासाठी जालन्यात योगगुरु रामेदवबाबा यांचे शिबीर आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. २४ ते २६ फेब्रुवारीदरम्यान येथील कलश सीड्समध्ये सकाळी साडेपाच ते सात या वेळेत होणाºया शिबिरासाठी विविध पातळ्यांवर तयारी सुरू आहे. यासाठी तीस समित्यांची स्थापना करण्यात आली असून, प्रत्येकाच्या जबाबदा-या निश्चित करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी शिबिरात सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी पंतजली योगपीठाचे महाराष्ट्र प्रमुख बापू पाडळकर, राज्य महिला प्रभारी सुधा अळीमोरे, उद्योजक घनश्याम गोयल, उदय वाणी, कल्पना ठोकळ, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, भाजपचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे आदींची उपस्थिती होती.