मुलीवर अत्याचार करणाऱ्या वडिलास पाच वर्षे सक्तमजुरी
By दिपक ढोले | Published: October 4, 2023 09:10 PM2023-10-04T21:10:16+5:302023-10-04T21:11:04+5:30
मुलीने आईला ही बाब सांगितली.
दीपक ढोले, जालना : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपी वडिलास जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी पाच वर्षे सक्तमजुरी व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षाही सुनावली आहे. पीडित मुलगी ही १३ वर्षांची होती. सप्टेंबर २०१७ मध्ये पीडिता तिच्या घरात झोपलेली होती. त्याचवेळी आरोपी वडिलाने मुलीवर अत्याचार केला.
मुलीने आईला ही बाब सांगितली. त्याचवेळी सासू व नवऱ्याने त्यांना मारहाण केली. पीडित मुलीची आई ही मुंबई येथे गेली असता, त्यांनी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध निर्मलनगर पोलिस ठाणे वांद्रा येथे तक्रार दाखल केली. ही तक्रार सदर बाजार पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आली. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षाच्या वतीने एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये पीडिता, तिची आई, पंच साक्षीदार, मुख्याध्यापिका, पोलिस उपनिरीक्षक योगेश चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक विजय थोटे यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.
न्यायालयाने सरकार पक्षातर्फे दिलेला पुरावा व युक्तिवाद लक्षात घेऊन जिल्हा व सत्र न्यायाधीश के. बी. ईंप्पर यांनी आरोपीला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता वर्षा लक्ष्मीकांत मुकीम यांनी काम पाहिले.